बीएमसीच्या ९१ हजार कोटींच्या मुदतठेवींवर भाजपचा डोळा; महापालिकेला दिवाळखोर करण्याचा डाव – काँग्रेसचा घणाघात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बीएमसीच्या ९१ हजार कोटींच्या मुदतठेवींवर भाजपचा डोळा; महापालिकेला दिवाळखोर करण्याचा डाव – काँग्रेसचा घणाघात

Share This

मुंबई, दि. ३० जून : मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे ९१ हजार कोटी रुपयांच्या मुदतठेवी मोडून बीएमसीला आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर करण्याचा भाजप-महायुती सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोप करत मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राजहंस म्हणाले, "मुंबई महानगरपालिका ही भाजपा महायुतीसाठी भ्रष्टाचाराचे कुरण बनली असून मुंबईकरांच्या हक्काच्या पैशावर सातत्याने दरोडा टाकला जात आहे. मागील आर्थिक वर्षात तब्बल ४ हजार कोटी रुपयांच्या मुदतठेवी मोडण्यात आल्या असून आता उर्वरित ९१ हजार कोटींच्याही मुदतठेवींवर सरकारची वाकडी नजर आहे."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "बीएमसीच्या मुदतठेवी काय चाटायच्या आहेत का?" असे वक्तव्य केल्याचा उल्लेख करत, त्याच वेळी सरकारचा हेतू स्पष्ट झाला होता, असा दावा राजहंस यांनी केला. "हा पैसा भाजपाचा पक्षनिधी नसून मुंबईकरांच्या करातून उभा राहिलेला निधी आहे. तोही संपविण्याचे कारस्थान सुरू आहे," असा आरोप त्यांनी केला.

राजहंस यांनी पुढे भाजपवर निशाणा साधताना म्हटले की, "भाजपाने प्रभू श्रीरामालाही सोडले नाही. अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्यांवरही दरोडा टाकल्याचा आरोप झाला. मग मुंबई महापालिकेला ते कसे सोडतील?"

मुंबईतील पायाभूत सुविधांवरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. "कोट्यवधी रुपये खर्चूनही मुंबईकरांना दर्जेदार रस्ते, पुरेसे स्वच्छ पिण्याचे पाणी आणि सक्षम आरोग्य सुविधा मिळत नाहीत. बेस्ट उपक्रम विकून खाण्याचे षडयंत्र सुरू आहे. भाजपा महायुती ही केवळ लुटारूंची गँग बनली आहे," असा घणाघात त्यांनी केला.

दरम्यान, काँग्रेसच्या या आरोपांवर भाजप किंवा राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages