घरकाम व असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी 'स्वाभिमान निधी' योजना तातडीने मंजूर करा – किशोरी पेडणेकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 June 2026

घरकाम व असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी 'स्वाभिमान निधी' योजना तातडीने मंजूर करा – किशोरी पेडणेकर


मुंबई - घरकाम करणाऱ्या तसेच असंघटित क्षेत्रात कार्यरत महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेली 'स्वाभिमान निधी' योजना राज्य सरकारने तातडीने मंजूर करावी, अशी मागणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी किशोर पेडणेकर यांनी केली आहे.

'लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत स्वयंरोजगार व असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांना दरमहा २,५०० ते ३,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पाठपुराव्यानंतर महानगरपालिकेकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

पेडणेकर यांनी सांगितले की, वाढती महागाई, घरखर्चाचा वाढता बोजा आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर महिलांना आर्थिक आधार मिळावा यासाठी ही योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीदरम्यान पक्षाने घरकाम करणाऱ्या महिलांसाठी अर्थसहाय्याची घोषणा केली होती. त्यानुसार प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.

सभागृहनेते गणेश खणकर यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत योजनेची व्याप्ती वाढवली आणि त्याला 'स्वाभिमान निधी' असे नाव देण्यात आले. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी योजनेचा सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे.

असंघटित क्षेत्रातील महिलांना उदरनिर्वाहासाठी तसेच आकस्मिक आर्थिक संकटांच्या वेळी मदत मिळावी, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर लाभार्थींची पात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून या योजनेच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून, लाखो महिलांना याचा लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS