चेंबूर बस दुर्घटना : निष्काळजी अधिकाऱ्याचे निलंबन, कंत्राटदारावरही कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 July 2026

चेंबूर बस दुर्घटना : निष्काळजी अधिकाऱ्याचे निलंबन, कंत्राटदारावरही कारवाई


मुंबई | जेपीएन न्यूज डेस्क, दि. १ जुलै : 
चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी आठ दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी प्रथमदर्शनी निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले असून, संबंधित कंत्राटदाराविरुद्धही कठोर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

या दुर्घटनेच्या चौकशीसाठी उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे आणि उपआयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे यांची दोन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीने तज्ज्ञांचा सल्ला घेऊन दुर्घटनेची कारणमीमांसा करावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक शिफारशी कराव्यात, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

३० जून रोजी चेंबूर पश्चिम येथील डायमंड गार्डनजवळून युनिव्हर्सल हायस्कूलची बस जात असताना रस्त्यालगतचा ६० ते ७० वर्षे जुना पिंपळाचा वृक्ष मुळासकट उन्मळून बसवर कोसळला. बसमधील १३ विद्यार्थ्यांपैकी १२ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र, गंभीर जखमी झालेल्या ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.

महापालिकेच्या माहितीनुसार, संबंधित वृक्षाबाबत यापूर्वी कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झाली नव्हती. १२ मे २०२६ रोजी वृक्षाचे सर्वेक्षण करण्यात आले होते आणि बाह्य तपासणीत तो सुस्थितीत असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच २९ मे २०२६ रोजी पावसाळ्यापूर्वी त्याची नियमित छाटणीही करण्यात आली होती.

महापालिकेने सांगितले की, २०२६ मध्ये आतापर्यंत ४६८ धोकादायक किंवा मृत वृक्ष हटविण्यात आले, तर १ लाख ३१८ वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. तरीही वृक्ष कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी धोकादायक झाडांचे नव्याने सर्वेक्षण, कालबद्ध पुनर्परीक्षण आणि आवश्यक छाटणी करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

दरम्यान, मुंबईत झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०२३ मध्ये ६८७, २०२४ मध्ये ६५३ आणि २०२५ मध्ये ८५५ झाडे महापालिका आणि खासगी क्षेत्रात उन्मळून पडल्याची नोंद आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS