मुंबईत झाडे ठरतायत जीवघेणी; तीन वर्षांत १२ मृत्यू, १२५ जण जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 July 2026

मुंबईत झाडे ठरतायत जीवघेणी; तीन वर्षांत १२ मृत्यू, १२५ जण जखमी


मुंबई | जेपीएन न्यूज डेस्क (१ जुलै) : मुंबईत प्रत्येक पावसाळ्यात झाडे आणि झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असतानाही त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात अपयश येत असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन वर्षांत (१६ मे २०२३ ते १६ मे २०२६) अशा दुर्घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू, तर १२५ जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मुंबईतील विविध भागांत दरवर्षी मान्सून सुरू होताच उन्मळून पडणारी झाडे आणि कोसळणाऱ्या फांद्या नागरिकांसाठी मोठा धोका ठरत आहेत. या दुर्घटनांमध्ये पादचारी, वाहनचालक, रिक्षा-टॅक्सी प्रवासी आणि आता शाळकरी मुलांनाही जीव गमवावा लागत असल्याने पालिकेच्या वृक्ष व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

गेल्या तीन वर्षांतील अनेक घटना गंभीर ठरल्या आहेत. जुलै २०२४ मध्ये वरळीतील बीडीडी चाळ परिसरात वडाच्या झाडाची फांदी कोसळून ४५ वर्षीय अमित जगताप यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या एका दिवसात परळ बस डेपो परिसरात झाड कोसळून ५७ वर्षीय वर्षा मिस्त्री यांचा मृत्यू झाला. दादर, अंधेरी, खार, कारमायकेल रोडसह अनेक भागांत झाडे कोसळून नागरिक जखमी झाले, वाहनांचे नुकसान झाले आणि वाहतूक विस्कळीत झाली.

यंदाच्या पावसाळ्यातही झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मंगळवारी चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळल्याने ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर चार विद्यार्थी जखमी झाले. या घटनेमुळे पालिकेच्या धोकादायक झाडांच्या पाहणी, छाटणी आणि देखभाल प्रक्रियेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण, छाटणी आणि आवश्यक ती कारवाई केल्याचा दावा महापालिका करते. मात्र, वारंवार घडणाऱ्या दुर्घटना पाहता या उपाययोजनांची परिणामकारकता किती, असा प्रश्न आता मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages