पावसाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर; नागरिकांनी दोन दिवस घराबाहेर पडू नये – मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 July 2026

पावसाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर; नागरिकांनी दोन दिवस घराबाहेर पडू नये – मुख्यमंत्री


मुंबई | जेपीएन न्यूज डेस्क | ६ जुलै -
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व शासकीय यंत्रणांना २४x७ 'अलर्ट मोड'वर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, आज आणि उद्या अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि शक्य असल्यास 'वर्क फ्रॉम होम'चा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.

मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षातून राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुंबईसह किनारपट्टी भागात ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून दुपारी ३ ते ४.३० वाजेदरम्यान समुद्राला उच्च भरती येणार आहे. त्यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावरील भूस्खलनामुळे निर्माण होणारे अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरासाठी विशेष सतर्कतेचा इशारा - 
अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुमारे ३०० मिमीपर्यंत ढगफुटीसदृश पावसाची शक्यता असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला विशेष सतर्क राहण्याचे निर्देश दिले. तसेच पर्यटकांनी पुढील काही दिवस त्र्यंबकेश्वर परिसरात जाणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.

'शून्य बळी' हेच पुढील ४८ तासांचे उद्दिष्ट -
पुढील ४८ तास 'शून्य बळी' हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी कमाल दक्षता घ्यावी, अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

एका दिवसात ३०० झाडे कोसळली -
मुंबईत अवघ्या चार दिवसांत एका महिन्याच्या सरासरीइतका पाऊस झाला असून, एका दिवसात सुमारे ३०० झाडे कोसळल्याची माहितीही त्यांनी दिली. येत्या ८ जुलैपर्यंत हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज असल्याने सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी खाजगी आस्थापनांनाही मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' सुविधा देण्याचे आवाहन केले असून, त्याचे पालन न करणाऱ्या संस्थांवर कारवाईचा इशाराही दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages