मुंबईवर पावसाचा कहर; आठवडाभरात ११ मृत्यू, २२ जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 July 2026

मुंबईवर पावसाचा कहर; आठवडाभरात ११ मृत्यू, २२ जखमी


मुंबई | जेपीएन न्यूज, ६ जुलै :
जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने आणि ताशी ५० ते ९० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. गेल्या सात दिवसांत झाडे, फांद्या, इमारती आणि घरांच्या पडझडीच्या घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू, तर २२ जण जखमी झाले आहेत. याच कालावधीत मुंबईत एक हजाराहून अधिक झाडे आणि १,३०० पेक्षा अधिक झाडांच्या फांद्या कोसळल्याची नोंद बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे झाली आहे.

२७ जूनपासून सुरू झालेल्या पावसाने मुंबईत मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर पिंपळाचे झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, कुर्ला पश्चिम येथे दुकानावर झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू, आरे कॉलनीत दुचाकीस्वार तरुणावर फांदी पडून मृत्यू, मानखुर्दमध्ये तीन मजली चाळ कोसळून सहा जणांचा मृत्यू, वाळकेश्वर येथे इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू, तसेच साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू अशा दुर्दैवी घटनांनी मुंबई हादरली.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, २२ जून ते ६ जुलै या कालावधीत शहरात १,००० हून अधिक झाडे आणि १,३०० पेक्षा जास्त फांद्या कोसळल्या. केवळ रविवारी सकाळी ९ ते रात्री ७ या दहा तासांत ३२७ झाडे आणि ४६८ फांद्या कोसळल्या. त्यापैकी १३९ झाडे मुंबई शहरात पडली असून, त्यात ८५ झाडे महापालिकेच्या हद्दीतील आणि ५४ झाडे खासगी जागांवरील होती. त्याच दिवशी शहरात १७४ ठिकाणी फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या.

सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीतही १९१ हून अधिक झाडे आणि फांद्या कोसळल्याची नोंद झाली.

एका दिवसात १० जण जखमी

रविवारी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विविध भागांत झाडे कोसळून १० जण जखमी झाले. जोगेश्वरी पश्चिम, आंबोली येथील मटरपाडा परिसरात पहाटे घरावर झाड कोसळून सात जण जखमी झाले. त्यापैकी चार जणांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या दुर्घटनेत गर्भवती महिलेचाही समावेश आहे.

याशिवाय गोरेगाव पश्चिम येथे रिक्षावर झाड कोसळून एक जण, तर वरळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर रस्त्यावर झाड कोसळून दोन जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा इशारा कायम असल्याने प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे, झाडे, जीर्ण इमारती आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS