अतिवृष्टीमुळे SIR प्रक्रियेला मुदतवाढ; प्रारूप मतदार यादी १७ ऑगस्टला, अंतिम यादी १९ ऑक्टोबरला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 July 2026

अतिवृष्टीमुळे SIR प्रक्रियेला मुदतवाढ; प्रारूप मतदार यादी १७ ऑगस्टला, अंतिम यादी १९ ऑक्टोबरला


मुंबई | JPN NEWS - 
राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेला अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे प्रत्यक्ष घरभेटी आणि गणना प्रपत्रांचे वितरण प्रभावित झाल्याने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या विनंतीला मान्यता देत भारत निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडून घरभेटीची मोहीम आता ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. याच कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि पुनर्रचना देखील पूर्ण करण्यात येईल.

यानंतर १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या कालावधीत नागरिकांना दावे आणि हरकती दाखल करता येतील. त्यानंतर सुनावणी व दावे-हरकतींचा निपटारा करून १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

दरम्यान, मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये SIR प्रक्रियेचा वेग तुलनेने कमी असल्याने तसेच पुनर्विकासग्रस्त इमारतींमधील मतदारांच्या नोंदणीबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे अद्याप SIR प्रक्रिया पूर्ण न झालेल्या लाखो मतदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी सर्व पात्र नागरिकांना निर्धारित मुदतीत गणना प्रपत्र (Enumeration Form) भरून निवडणूक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच मतदारांनी आपली माहिती अचूक भरून वेळेत सादर करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुधारित SIR वेळापत्रक
घरभेट मोहीम (BLO): ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६
प्रारूप मतदार यादी: १७ ऑगस्ट २०२६
दावे व हरकती: १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६
अंतिम मतदार यादी: १९ ऑक्टोबर २०२६

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS