मानखुर्दमध्ये तीन मजली चाळ कोसळून ६ जणांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2026

मानखुर्दमध्ये तीन मजली चाळ कोसळून ६ जणांचा मृत्यू


मुंबई | जेपीएन न्यूज डेस्क, ५ जुलै : 
मुंबईतील मानखुर्द परिसरात रविवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. जनता नगर येथील हनुमान मंदिरामागील चाळ क्रमांक ५ मधील तळमजला अधिक तीन मजली संरचनेतील दोन ते तीन झोपडीनुमा घरे कोसळून ६ जणांचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून शोध व बचावकार्य सुरू आहे.

ही घटना रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल (MFB), मुंबई पोलीस, बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला चार ते पाच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. बचाव पथकांनी तातडीने शोधमोहीम सुरू करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना जवळच्या शताब्दी आणि राजावाडी रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शताब्दी रुग्णालयात चार महिला आणि एका पुरुषासह पाच जणांना मृत अवस्थेत आणण्यात आले, तर राजावाडी रुग्णालयात एका पुरुषाचा मृत्यू झाला असून एक पुरुष जखमी अवस्थेत उपचाराधीन आहे.

मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages