महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा खासगीकरणाचा ठेका रद्द करा; कामगार सेनेची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2026

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा खासगीकरणाचा ठेका रद्द करा; कामगार सेनेची मागणी


मुंबई | जेपीएन न्यूज डेस्क - ५ जुलै, 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा संकलन, वाहतूक आणि निकर्षण (Disposal) कामाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगार, मोटर लोडर, वाहनचालक आणि तांत्रिक कर्मचारी वर्षाचे ३६५ दिवस, २४ तास अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. अशा परिस्थितीत हे काम खासगी ठेकेदारांकडे सोपविल्यास महापालिकेला पूर्णपणे ठेकेदारांवर अवलंबून राहावे लागेल, तसेच सार्वजनिक सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

युनियनने दावा केला आहे की, या निर्णयामुळे सुमारे १५ हजार कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो. तसेच या ठेक्यासाठी महापालिकेला दरवर्षी सुमारे ९०० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागू शकतो.

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, मोटर लोडर, पर्यवेक्षक आणि परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या नियमित कामकाजात बदल होण्याची शक्यता असून त्यामुळे पदोन्नती, वारसाहक्क आणि सेवाशर्तींवर परिणाम होऊ शकतो. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

२८ जुलै २०२५ रोजी झालेला करार कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याचे सांगत, तत्कालीन संघर्ष समितीबाहेरील सुमारे २७ कामगार संघटनांनीही हा करार रद्द करण्याची मागणी केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून घनकचरा व्यवस्थापनाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा आणि विद्यमान सार्वजनिक व्यवस्थाच कायम ठेवावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages