मुंबईसाठी दिलासादायक बातमी! विहार तलाव ओसंडून वाहू लागला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 July 2026

मुंबईसाठी दिलासादायक बातमी! विहार तलाव ओसंडून वाहू लागला


मुंबई | जेपीएन न्यूज | ७ जुलै - 
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक असलेला विहार तलाव मंगळवारी (७ जुलै) रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तलाव भरून वाहू लागल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली.

विहार तलावाची उपयुक्त जलधारण क्षमता २७,६९८ दशलक्ष लीटर असून, या तलावातून मुंबईला दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) पाणीपुरवठा केला जातो.

गेल्या वर्षी १८ ऑगस्ट २०२५ रोजी हा तलाव ओसंडून वाहू लागला होता. त्याआधी २५ जुलै २०२४ आणि २६ जुलै २०२३ रोजीही विहार तलाव भरून वाहिला होता. यंदा मात्र जुलैच्या पहिल्याच आठवड्यात तलाव ओव्हरफ्लो झाल्याने मुंबईच्या पाणीसाठ्याच्या दृष्टीने हा दिलासादायक संकेत मानला जात आहे.

सन १८५९ मध्ये बांधण्यात आलेल्या या ऐतिहासिक तलावाच्या उभारणीस त्यावेळी सुमारे ६५.५ लाख रुपये खर्च आला होता. मुंबई महापालिका मुख्यालयापासून सुमारे २८.९६ किलोमीटर अंतरावर असलेला हा तलाव पूर्ण भरल्यानंतर त्याचे अतिरिक्त पाणी मिठी नदीत जाऊन मिळते.

महापालिकेच्या मते, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी विहार हा सर्वात लहान दोन तलावांपैकी एक असून, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शहराच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS