झाडांच्या सुरक्षेसाठी नवी कार्यपद्धती; मुळांना पाणी पोहोचवण्यासाठी विशेष उपाययोजना – आयुक्त अश्विनी भिडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 July 2026

झाडांच्या सुरक्षेसाठी नवी कार्यपद्धती; मुळांना पाणी पोहोचवण्यासाठी विशेष उपाययोजना – आयुक्त अश्विनी भिडे


मुंबई | जेपीएन न्यूज | ७ जुलै २०२६ - 
मुसळधार पाऊस आणि ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका झाडांच्या संरक्षणासाठी नवी कार्यपद्धती राबविणार आहे. रस्त्यालगतच्या झाडांच्या मुळांपर्यंत पाणी पोहोचावे यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार असून, यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आयुक्त भिडे यांनी सांगितले की, २०१८ च्या वृक्षगणनेनुसार मुंबईत सुमारे २९.७५ लाख झाडे असून त्यापैकी सुमारे २ लाख झाडे रस्त्यांच्या कडेला आहेत. रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक आणि भूमिगत वाहिन्यांमुळे अनेक झाडांच्या मुळांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे झाडांच्या मुळांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी जमिनीत छिद्रे करून विशेष व्यवस्था करण्याचा पर्याय महापालिका तपासत आहे. अशा प्रकारचा प्रयोग यापूर्वी मलबार हिल परिसरात करण्यात आला होता.

यंदाच्या पावसाळ्यात अवघ्या काही दिवसांत ८३० झाडे आणि १,२३८ फांद्या कोसळल्या असून, त्यापैकी अनुक्रमे ४८० झाडे आणि ७०९ फांद्या खासगी जागांवरील असल्याचे त्यांनी सांगितले. एका दिवसात वर्षभरातील जवळपास ५० टक्के झाडे पडल्याची अभूतपूर्व परिस्थिती यंदा निर्माण झाली.

महापालिका आता मुंबई विद्यापीठ, आयआयटी आणि वृक्षतज्ज्ञांच्या सहकार्याने झाडांच्या देखभालीसाठी वैज्ञानिक कार्यपद्धती तयार करणार आहे. रस्त्यालगतच्या झाडांची शास्त्रोक्त छाटणी, नियमित सर्वेक्षण आणि भूमिगत कामांदरम्यान मुळांचे संरक्षण यावर विशेष भर दिला जाणार आहे.

आयुक्त भिडे यांनी सांगितले की, यंदा रस्त्यालगतच्या सुमारे एक लाख झाडांची छाटणी करण्यात आली असून उर्वरित झाडांचेही सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी छाटणी केली जाईल. तसेच वादळात पडलेल्या झाडांच्या बदल्यात योग्य ठिकाणी नव्याने वृक्षलागवड करण्यासाठीही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS