घनकचरा विभागाच्या खाजगीकरणाविरोधात कामगार आक्रमक; करार रद्द करण्याची आयुक्तांकडे मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 July 2026

घनकचरा विभागाच्या खाजगीकरणाविरोधात कामगार आक्रमक; करार रद्द करण्याची आयुक्तांकडे मागणी


मुंबई | जेपीएन न्यूज - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कचरा संकलन, परिवहन आणि निष्कासनाचे काम खासगी ठेकेदारांकडे देण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई मनपा खाजगीकरण विरोधी समिती आक्रमक झाली आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाचा तीव्र निषेध करत २८ जुलै २०२५ रोजी झालेला करार तातडीने रद्द करण्याची मागणी केली.

यानंतर समितीने महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना निवेदन सादर करून हा करार रद्द करण्याची आणि या विषयावर तातडीने चर्चा आयोजित करण्याची मागणी केली आहे.

समितीने निवेदनात म्हटले आहे की, घनकचरा व्यवस्थापन विभागातील मोटर लोडर, वाहन चालक आणि परिवहन विभागातील कायम कर्मचाऱ्यांचे नियमित काम ठेकेदारांकडे दिल्यास सुमारे १९ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरी, पदोन्नती, वारसाहक्क आणि सेवाशर्तींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. करारात या कर्मचाऱ्यांना पुढे कोणते काम दिले जाणार याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

एस विभागातील काही मोटर लोडर कर्मचाऱ्यांनी त्यांना देण्यात आलेले पर्यायी साफसफाईचे काम स्वीकारण्यास नकार दिल्याचेही समितीने सांगितले.

पत्रकार परिषदेत समितीचे निमंत्रक ॲड. प्रकाश देवदास, ॲड. नवनाथ महारनवर आणि डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी प्रशासनाने कामगारांच्या हिताविरोधातील निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. त्यांनी घनकचरा विभागाचे खाजगीकरण थांबवून कायम कर्मचाऱ्यांचे हक्क आणि सेवाशर्ती अबाधित ठेवाव्यात, अशी मागणीही केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS