स्टार्टअपमधून विकसित भारत घडवा; विद्यापीठे नवोपक्रमांची केंद्रे बनली पाहिजेत - राज्यपाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 July 2026

स्टार्टअपमधून विकसित भारत घडवा; विद्यापीठे नवोपक्रमांची केंद्रे बनली पाहिजेत - राज्यपाल


मुंबई | जेपीएन न्यूज - ज्ञानाचे उद्योगात रूपांतर करून विकसित भारत घडविण्यासाठी विद्यापीठांनी केवळ पदवी देणाऱ्या संस्था न राहता नवोपक्रम, बौद्धिक संपदा, स्टार्टअप्स आणि उद्योजकतेची केंद्रे बनले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि आय स्पार्क फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'स्टार्टअप फ्रंटियर 1.0' परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा, कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांच्यासह उद्योग, स्टार्टअप आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले की, भारतात कल्पकतेची कमतरता नाही, मात्र त्या कल्पनांचे यशस्वी उद्योगांमध्ये रूपांतर होणे गरजेचे आहे. भविष्यात विद्यापीठांची ओळख त्यांनी घडवलेल्या स्टार्टअप्स, नवोपक्रम आणि समाजावर झालेल्या सकारात्मक परिणामावर ठरेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदेशाद्वारे सांगितले की, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने अल्पावधीत ६१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम केला असून नवोपक्रम आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्र २०४७चे ध्येय साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्टार्टअप संस्कृती राज्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्य शासन उद्योग, शैक्षणिक संस्था आणि गुंतवणूकदारांच्या सहकार्याने महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे स्टार्टअप हब बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि आयआयटी मद्रास यांच्यात कौशल्य विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला. तसेच एचपी क्रिएटर्स गॅरेज लॅब आणि मेडिकल लॅबचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनात कृषी, एआय, मशीन लर्निंग, फिनटेक, डीपटेक आदी क्षेत्रांतील स्टार्टअप्सनी आपली नाविन्यपूर्ण उत्पादने आणि तंत्रज्ञान सादर केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS