
पुणे JPN NEWS - पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध बर्गर किंग आउटलेटवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान स्वच्छतेसह अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने संबंधित आस्थापनाचा फूड लायसन्स निलंबित करण्यात आला आहे. ही कारवाई ‘Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra’ या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत करण्यात आली.
FDAच्या पथकाने कॅम्पमधील ईस्ट स्ट्रीट परिसरातील या आउटलेटची तपासणी केली. तपासणीदरम्यान स्वयंपाकघरातील स्वच्छता, खाद्यपदार्थ तयार करण्याची प्रक्रिया आणि अन्न सुरक्षेशी संबंधित बाबींमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याचे वृत्त आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित आस्थापनाविरोधात कारवाईचा निर्णय घेतला.
सध्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे कार्यरत आहेत. FDAच्या अधिकृत संकेतस्थळावरही त्यांच्या आयुक्तपदाची नोंद आहे.
अन्न व्यवसायिकांनी स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोरपणे पालन करावे, यासाठी FDAकडून राज्यभर तपासणी मोहीम राबवली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई केली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुण्यातील लोकप्रिय खाद्य आस्थापनावर झालेल्या या कारवाईमुळे शहरातील खाद्य व्यवसाय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. संबंधित आस्थापनाला नियमांची पूर्तता करून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असून, त्यानंतरच पुढील कार्यवाहीबाबत निर्णय होऊ शकतो.


No comments:
Post a Comment