Mumbai Metro One - गर्दीच्या वेळेत अंधेरी-घाटकोपर दरम्यान 3 मिनिटांनी मेट्रो - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 August 2026

Mumbai Metro One - गर्दीच्या वेळेत अंधेरी-घाटकोपर दरम्यान 3 मिनिटांनी मेट्रो


मुंबई JPN NEWS -
मुंबई मेट्रो वनच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वर्सोवा–अंधेरी–घाटकोपर मेट्रो मार्गिकेवरील गर्दीच्या वेळेतील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन १० ऑगस्ट २०२६ पासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू करण्यात येणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे अंधेरी आणि घाटकोपरदरम्यान मेट्रोची वारंवारिता वाढून दोन ट्रेनमधील अंतर अवघे ३ मिनिटे राहणार आहे.

सध्या अंधेरी-घाटकोपरदरम्यान गर्दीच्या वेळेत दोन ट्रेनमधील अंतर ३ मिनिटे २० सेकंद आहे. नव्या व्यवस्थेमुळे हे अंतर ३ मिनिटांवर येणार असून प्रवासी वाहतूक क्षमता २० टक्क्यांहून अधिक वाढणार आहे. त्यामुळे दररोज सुमारे २८ हजार अतिरिक्त प्रवाशांना वाहतूक सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

काय आहे ‘मिक्स्ड-लूप’ सेवा?

या व्यवस्थेत एक ट्रेन घाटकोपर-अंधेरीदरम्यान शॉर्ट लूपवर धावेल, तर त्यानंतरची ट्रेन नेहमीप्रमाणे घाटकोपर ते वर्सोवा पूर्ण मार्गावर धावेल. अशा प्रकारे सर्वाधिक गर्दी असलेल्या अंधेरी-घाटकोपर पट्ट्यात अधिक ट्रेन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सुधारित वेळापत्रकानुसार आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी धावणाऱ्या एकूण ट्रेन फेऱ्यांची संख्या ४७६ वरून ४८४ इतकी वाढणार आहे. पहिली शॉर्ट-लूप ट्रेन अंधेरी डाउन प्लॅटफॉर्मवरून सायंकाळी ६.२३ वाजता सुटेल, तर शेवटची शॉर्ट-लूप ट्रेन रात्री ८.२३ वाजता सुटणार आहे. वर्सोवा आणि आझाद नगरदरम्यान गर्दीच्या वेळेत ट्रेनचे अंतर ३६२ सेकंद राहणार आहे.

या बदलाचा अंधेरी आणि घाटकोपरदरम्यान प्रवास करणाऱ्या ८५ टक्क्यांहून अधिक मेट्रो वन प्रवाशांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. ट्रेनची वारंवारिता वाढणे, प्रतीक्षा वेळ कमी होणे आणि सर्वाधिक गर्दीच्या मार्गावर अतिरिक्त प्रवासी क्षमता उपलब्ध होणे, हे या सेवेचे प्रमुख फायदे असतील.

मुंबई मेट्रो वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्यामंतक चौधरी यांनी सांगितले की, उपलब्ध पायाभूत सुविधांचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. गर्दीच्या वेळेत प्रवाशांचा प्रतीक्षा वेळ कमी करणे, प्रवासी वाहतूक क्षमता वाढवणे आणि अधिक जलद, सोयीस्कर व विश्वासार्ह सेवा देणे हा या बदलामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई मेट्रो वनकडून प्रवाशांच्या प्रवासाच्या पद्धतींचे सातत्याने विश्लेषण करून सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी विविध कार्यप्रणालीतील नवकल्पना राबविल्या जात आहेत. सुरक्षितता आणि विश्वासार्हतेचे निकष कायम ठेवत प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यावर भर दिला जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS