अनुसूचित जातींमध्ये फूट पाडणे थांबवा; अन्यथा आरएसएसच्या दरवाजावर धडक देऊ - प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 August 2026

अनुसूचित जातींमध्ये फूट पाडणे थांबवा; अन्यथा आरएसएसच्या दरवाजावर धडक देऊ - प्रकाश आंबेडकर


मुंबई JPN NEWS -
अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) थांबवावा, अन्यथा समाज थेट संघाच्या दरवाजावर धडक देईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवर केलेल्या पोस्टमधून आरएसएसवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

“आरएसएसने अनुसूचित जातींमध्ये फूट पाडणे बंद केले नाही, तर यावेळी समाज ना विचार करेल, ना काही पाहील, ना आंदोलनाची परवानगी घेईल. थेट आरएसएसच्या दरवाजासमोर पूर्ण ताकदीने धडक देईल,” अशा आशयाची भूमिका आंबेडकर यांनी मांडली.

नागपूर येथील रेशीमबाग परिसरातील आरएसएसच्या मुख्यालयासमोर यापूर्वी काढण्यात आलेल्या आंदोलनाचा संदर्भही त्यांनी दिला. मागील वेळी नागपुरात आंदोलन करण्यात आले होते, त्यावेळी आरएसएसच्या लोकांना कार्यालय सोडून जावे लागले होते. यावेळी मात्र कार्यालयच बंद करून टाकू, असा इशारा त्यांनी आपल्या पोस्टमधून दिला.

आरएसएसच्या संघटनेच्या नोंदणीबाबतही आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच आरएसएसशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या व्यक्ती आणि व्यावसायिकांबाबतही त्यांनी भाष्य केले. “तुमचे बाजारातील जे दुकानदार आहेत, त्यांना समाजातील लोक ओळखतात. त्यांच्या दारापर्यंतही समाजातील लोक जातील,” असा इशाराही त्यांनी दिला.

अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना विरोध करण्याची भूमिका आंबेडकर यांनी या पोस्टद्वारे स्पष्ट केली आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

दरम्यान, आंबेडकर यांच्या वक्तव्यावर आरएसएसकडून कोणती अधिकृत प्रतिक्रिया येते, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS