DATE- 30 April 2012 निर्मलबाबा ? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

DATE- 30 April 2012 निर्मलबाबा ?

Share This

DATE- 30 April 2012 
निर्मलबाबा ?

गेल्या काही दिवसात निर्मलबाबाच्या कथित कहाण्या पुढे आल्या. वास्तविक महाराष्ट्रात जादू-टोणा विरोधातील संकल्पीत कायदा आला असता तर असले बाबा नक्कीच पाच-सात वर्ष खडी फोडायला गेले असते. एकविसाव्या शतकात भारतासारख्या देशातील लोकांची मानसिकता अंधश्रध्दा आणि दैववाद याबाबतीत कोणत्या पातळीवर पोहोचली आहे याचे अस्वस्थ करणारे दर्शन निर्मलबाबाला मिळालेल्या प्रतिसादाच्या निमित्ताने सर्वांनी पाहिले. वास्तविक निर्मलबाबा करत असलेले सर्व दावे हास्यास्पद होते.निर्मलबाबांच्या या दरबारात दोन हजार रुपये प्रवेश शुल्क देऊन 50 हजार लोक आठवडय़ातून दोनदा गर्दी करत होते. यातील प्रवेश शुल्काची रक्कम झाली एक कोटी रुपये आणि निर्मलबाबाच्या विरोधात आवाज उठवल्यानंतरही दरबारात रोज 35 ते 40 लाख रुपये जमा होतच होते. याचा अर्थ फसवणूक स्पष्ट झाल्यानंतरही हजारोंचा लोंढा निर्मलबाबाकडे जात होता. निर्मलबाबादेखील `मी अंधश्रध्दा वाढवत नाही. माझ्याकडे खरेच दैवी शक्ती आहे’ सारी माहिती माला सहाव्या इंद्रिय मुळे मिळते असे सांगत होता.
   वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करायचा, तर कोणतेही सहावे इंद्रिय अस्तित्त्वात नसते. त्यामुळे त्याबाबतचा निर्मलबाबाचा दावा ही निखालस फसवणूक आहे. शिवाय एका आकडेवारीनुसार या बाबाने भक्तांकडून दोन ते अडीज अब्ज रुपये कमावले. या रकमेवर आयकर भरण्याचाही प्रश्न आहे. मात्र, खरा प्रश्न आहे तो सार्या गोष्टी स्पष्ट असतानाही माणसे अशी का वागतात, हा. या व्यक्तींच्या अशा वागण्यातून कोणत्या सामाजिक वास्तवावर प्रकाश पडतो?
    खरे तर अंधश्रध्दा म्हणजे मानसिक गुलामीमुळे पावित्र्य लाभलेल्या शोषणाचा प्रभाव. यामुळे अंधश्रध्द मानसिकतेची चिकीत्सा करणे अवघड आणि बहुधा अशक्य बनते. अनेक धर्मग्रंथांमध्ये अनेक चमत्कार सांगितले आहेत. दैव, प्रारब्ध मानत नशिबात असेल ते सोसणे हे हिंदू धर्मातील कर्मफल सिध्दांताच्या स्वाभाविक मांडणीत आहे. बहुसंख्य भारतीय अशा वातावरणात वाढतात. त्यामुळे ते निर्मलबाबासारख्या भोंदूच्या कारनाम्यांना सहज बळी पडतात. खरे तर निर्मलबाबाला मिळणारा प्रतिसाद म्हणजे भारतीय संविधानाचा आणि शैक्षणिक धोरणाचा पराभव आहे, हे गांभीर्याने लक्षात घ्यायला हवे.भारतीय घटनेत वैज्ञानिक दृष्टीकोन, सुधारणावाद आणि मानवतावाद बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे. पण निर्मलबाबाच्या भजनी लागणे म्हणजे याच्या नेमके उलट वर्तन होय. मग ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करावे, असा प्रश्न उभा राहतो.
    एक गोष्ट चांगली आहे की, भारताच्या शैक्षणिक धोरणात वैज्ञानिक मनोवृत्तीची जोपासना हा महत्त्वाचा गाभा, घटक आहे. शालेय मूल्यशिक्षणात वैज्ञानिक दृष्टीकोनाचा आवर्जून समावेश आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन याचा अर्थ कोणत्याही घटनेचा कार्यकारणभाव तपासणे. या पार्श्वभूमीवर निर्मलबाबाला मानणे याचा अर्थ स्वतःची बुध्दी आणि कार्यकारण भावाप्रमाणे तपासणी या दोन्ही गोष्टी गुंडाळून ठेवून बुवाबाजीला शरण जाणे. म्हणूनच शिक्षणातील वैज्ञानिक दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो.  राज्यात एक लाख प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत. सहा लाख शिक्षक आहेत आणि दोन कोटी 20 लाख विद्यार्थी आहेत. या परिस्थितीत शिक्षणामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन आग्रहपूर्वक आणि कृतीशील पध्दतीने रूजवला तर मोठेच पाऊल पडेल.
दुसरी बाब प्रसारमाध्यमांची. खरे तर निर्मलबाबासारख्या फ्रॉड असलेल्या व्यक्तीचे कारनामे माध्यमांनी, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी दाखवता कामा नये. दाखवलेच, तर त्याची भांडाफोड स्वतः लगेच करावयास हवी. जाहिरातीचे पैसे देऊ शकले म्हणून निर्मलबाबाचे गुणगान करण्याचे पाप काही वाहिन्यांनी केले. पण प्रसिध्दीमाध्यमांवर सेन्सॉरशिप नको असेल तर त्यांनी स्वतःची आचारसंहिता तयार करावी. मात्र, अशा अपप्रवृत्तींना थारा देऊ नये.
अजेयकुमार जाधव 
मो.९९६९१९१३६३ 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages