DATE- 27 May 2012 नालेसफाईच्या समन्वयात अभाव
दरवर्षी पावसाळ्यात मुंबई मध्ये साचणाऱ्या पाण्यामुळे मुंबईकरांना पावसाळ्यामध्ये बहुतेकवेळा कामाचा खाडा करावा लागला आहे तर कधी या पावसाचे पाणी नाल्याच्या बाजूला तुंबून घरात पाणी घुसल्याने मुंबईकरांच्या मालमत्तेचे नुकसान होत आले आहे. यावर्षीही पालिका, राज्य सरकार व इतर संस्थांमध्ये नालेसफाई बाबत समन्वय नसल्याने व एकमेकंवर होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकिंमुळे मुंबई मध्ये यावर्षीही पाणी नक्कीच साचेल यात तिळमात्र शंका नाही.
मुंबई महानगर पालीकेंच्या वतीने नालेसफाई बाबत बैठका घेतल्या जात आहेत या बैठकांमध्ये पावसाळा जवळ आला तरी नालेसफाई ७० टक्केच झाल्याचे सांगण्यात येत आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा फुगवून सांगितलेला आकडा असला तरी मुंबई मधील परिस्थिती वेगळी आहे .मुंबई मध्ये फेरफटका मारल्यावर नालेसफाईचे हे आकडे फसवे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. नालेसफाई किती चांगल्या प्रकारे होत आहे हे दाखवण्यासाठी महापौर, पालिका आयुक्त यांचे दौरे आयोजित केले जात आहेत. या दौऱ्यांच्या ठिकाणी तेवढी नालेसफाई दिसत असली तरी इतर ठिकाणी मात्र परिस्थिती वेगळी दिसत आहे.
काही ठिकाणी नालेसफाईची दिशाभूल केली जात आहे. नाल्यांमध्ये वर वर दिसेल तेवढीच सफाई केली जात आहे. खाली असलेला गाळ मात्र काढण्याकडे कंत्राटदार दुर्लक्ष करत असल्याने नालेसफाईची फसवी आकडेवारी सादर करून कंत्राटदार आपली बिले मात्र पास करून घेण्याच्या मागे लागले आहे. अधिकारी वर्गही आपल्यालाही मलिदा मिळेल म्हणून कंत्राटदार देतील ती बिले पास सुद्धा करतील परंतु मुंबईकर मात्र साचणाऱ्या पाण्यामुळे दरवर्षाप्रमाणे त्रस्त होणार आहेत. पालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या नाल्यांबाबत ही परिस्थिती असताना पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त व महापौरांनी नालेसफाई बाबत घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये शासनाच्या अखत्यारित असलेल्या एमएमआरडीए, रेल्वे, इत्यादी प्रशासनांनी नालेसफाई योग्य रित्या केली नसल्याचा आरोप करत ३१ मे पूर्वी नालेसफाई करावी अशे निर्देश दिले आहेत.
एमएमआरडीए प्रशासनाने नाले सफाई उशिरा चालू केल्याचे कारण देत ३१ मे ची डेडलाईन पाळण्यास नकार दिला आहे. एमएमआरडीए प्रशासनाने आमची नालेसफाई ७ जून पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले आहे. रेल्वेच्या हद्दीमधील नालेसफाई सुद्धा योग्य रित्या झाली नसल्याने मध्य व हार्बर रेल्वे वरील नालेसफाई योग्यरीत्या करण्यासाठी सांगण्यात आले आहे तरीही रेल्वे मध्ये कुठेही अशी सफाई होत नसल्याचे दिसत आहे.
याच वेळी मान्सून ८ ते १० जूनच्या दरम्यान मुंबईत दाखल होण्याची शक्यता असल्यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीस समर्थपणे तोंड देण्यासाठी सरकारी यंत्रणांनी पूर्णपणे सज्ज राहण्याचे आदेश देत , जबाबदारीच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी दिला. मिठी नदीतील अतिक्रमणे काढण्याची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
रेल्वे , महापालिका , एमएमआरडी ए , पोलिस दल , त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या आपत्ती निवारण यंत्रणांनी जबाबदारीने सतर्क राहून कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित यंत्रणेस जबाबदार धरण्यात येईल , अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी कारवाहीची तंबी दिली असली तरी पालिका, राज्य व केंद्र शासनाच्या रेल्वे, एमएमआरडीए, एअर पोर्ट, या संस्थांमध्ये समन्वय नसल्याने यावर्षी सुद्धा मुंबई मध्ये ठीक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांना दरवर्षी प्रमाणेच त्रस्त व्हावे लागणार आहे.
अजेयकुमार जाधव
मो.९९६९१९१३६३


No comments:
Post a Comment