मराठी माणूस हद्दपार होतोय म्हणणारे पडले तोंडघशी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 September 2012

मराठी माणूस हद्दपार होतोय म्हणणारे पडले तोंडघशी


मराठी माणूस हद्दपार होतोय म्हणणारे पडले तोंडघशी


मुंबई -मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होतोय, असे वारंवार दवंडी पिटत राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणारे नेते व पक्ष तोंडावर पडल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून येत आहे. सध्या मुंबईची लोकसंख्या १ कोटी २० लाखांच्या आसपास असून त्यातील ७० टक्के नागरिक, लोक हे महाराष्ट्रातील विविध शहरातून व ग्रामीण भागातूनच आल्याचे सर्वेक्षणात सिद्ध झाले आहे. बिहार, उत्तर प्रदेशसह देशाच्या उर्वरित राज्यांमधून जास्त स्थलांतर होत नसल्याचे  सर्वेक्षणात म्हटले गेले आहे.

स्थलांतरिताचे सर्वेक्षण करणा-या 'राष्ट्रीय सर्वेक्षण घटक संघटने'ने (एनएसएसओ) याबाबत एक अहवाल नुकताच जाहीर केला. या अहवालात म्हटले आहे की, मुंबईत सर्वांधिक स्थलांतरित होणा-या नागरिकांमध्ये महाराष्ट्रातील दुय्यम शहरांतील व ग्रामीण भागातील लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. हे सर्व स्थलांतरित होणारे लोक हे नोकरी व उदरनिर्वाहासाठी मुंबईत आल्याचे अहवालात म्हटले आहे.

बिहार, उत्तर प्रदेशसह देशातील इतर राज्यांतूनही मुंबईत स्थलांतर झाले आहे. मात्र, त्याचे प्रमाण हे २५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. १०० स्थलांतरितांमागे २०-२१ लोक इतर राज्यांतून नोकरीसाठी आल्याचे म्हटले आहे. मुंबईत परदेशी नागरिक, मूळ भारतीय पण इतर देशांतील नागरिकत्व असलेली कुटुंबेही स्थलांतरित होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत प्रत्येक १००० नागरिकांमागे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून आलेली ३७० लोक, महाराष्ट्रातील इतर शहरातून आलेले ३३० लोक आहेत. १९८ नागरिक देशाच्या इतर राज्यांतून तर ९४ नागरिक इतर राज्यातील दुय्यम शहरातून आले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS