भाजपतर्फे आज केवळ मोर्चा आणि निदर्शने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 September 2012

भाजपतर्फे आज केवळ मोर्चा आणि निदर्शने

भाजपतर्फे आज केवळ मोर्चा आणि निदर्शने
मुंबई - डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात एनडीएने दिलेल्या "भारत बंद'च्या आवाहनात मुंबई आणि परिसरात प्रतिसाद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना आणि मनसेने या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय जनता पक्षानेही केवळ निदर्शने आणि मोर्चा काढण्याचे धोरण स्वीकारले आहे.

मुंबईमध्ये भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरवातीला व्यापारी आणि औद्योगिक बंद पाळण्याचे आवाहन भाजपने केले होते. मात्र, आज नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळावा, असे आवाहन भाजपने केले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सरकारी कार्यालये आणि खासगी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न भाजपचे कार्यकर्ते करणार नाहीत, असे आज सांगण्यात आले. दरम्यान, राज्य सरकारतर्फे भाजपचा "भारत बंद' मोडून काढण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष राज पुरोहित यांच्याकडून पोलिस सहआयुक्त सदानंद दाते यांनी मोर्चाबाबत सर्व माहिती घेतली. शांततेत भाजप मोर्चा आणि निदर्शने करेल, अशी ग्वाही पुरोहित यांनी दिली. राज्य सरकारनेही सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. रजा आणि सुट्टी वगळता जे कर्मचारी उद्या गैरहजर राहतील त्यांच्यावर कारवाईचा इशारा सरकारने दिला आहे.

बंदमध्ये माथाडी कामगार, वाहतूक संघटना सहभागी होणार आहेत. यामुळे वाशीमधील सर्वांत मोठ्या बाजारपेठेतील पाचही घाऊक बाजारपेठा बंद राहतील, अशी शक्‍यता आहे. मात्र, दूध, भाजीपाला आणि अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या गाड्यांना बंदमधून सवलत दिल्याची माहिती वाहतूक संघाने दिली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरात बंदला प्रतिसाद मिळणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, सर्व व्यवहार सुरळीत चालू राहतील, असा दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे; पण व्यापारी संघटना उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी झाल्यास दैनंदिन व्यवहारावर पडसाद पडतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS