‘चैत्यभूमी’वरील टपाल तिकिटाचा प्रस्ताव पडून - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘चैत्यभूमी’वरील टपाल तिकिटाचा प्रस्ताव पडून

Share This

‘चैत्यभूमी’वरील टपाल तिकिटाच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष 




मुंबई - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दादर येथील इंदू मिलच्या जागेचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्याप्रमाणेच दादर येथीलच चैत्यभूमीच्या वास्तूचे महत्त्व अबाधित राहावे आणि कायम जतन व्हावे, यासाठी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी तयार केलेला चैत्यभूमीवरील टपाल तिकिटाचा प्रस्तावही अंतिम मंजुरीसाठी गेल्या सात महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी स्मारकाला त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी आणि जयंतीदिनी लाखो अनुयायी भेट देण्यासाठी येतात. तसेच वर्षभरही देश- विदेशातील बौद्धधर्मीय आणि पर्यटक आवर्जून या ठिकाणी येत असतात. या वास्तूचे महत्त्व सर्वदूर पसरावे आणि टपाल तिकिटाच्या माध्यमातून त्याचे जतन व्हावे, या उद्देशाने पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी चैत्यभूमीवरील टपाल तिकीट काढण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच त्यांनी मुंबई महापालिकेकडे परवानगीकरिता विनंती केली. मात्र, हे स्मारक आपल्या हद्दीत असले तरी त्याचे सर्व अधिकार राज्य शासनाकडे असल्याचे पालिकेने कळवले.

महापालिकेने असर्मथता दाखविल्यानंतर ढोबळे यांनी मुंबईच्या जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, त्यांनी तातडीने याबाबत माहिती संकलित करून प्रस्ताव तयार करण्यास त्यांना मदत केली. मात्र, हा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या अंतिम स्वाक्षरीने केंद्राकडे पाठवला जातो. मार्च 2012 महिन्यात याबाबतची कार्यवाही पूर्ण करून 14 एप्रिल 2012 या बाबासाहेबांच्या जयंतीदिनी या टपाल तिकिटाचे प्रकाशन व्हावे, यासाठी ढोबळे सर्वतोपरी प्रयत्न करीत होते. त्यासाठी त्यांनी मार्च महिन्यातच सामान्य प्रशासन विभागाकडे हा प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांचे सचिव जैन यांच्याकडे पाठवण्यात आला मात्र, विविध कारणे सांगून अद्याप या प्रस्तावावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्यवाही झालेली नाही.

दरम्यान, ढोबळे यांनी पाठविलेल्या प्रस्तावानंतर आलेल्या सानेगुरुजी विद्यालयाचे संस्थापक प्रकाश मोहाडीकर यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या टपाल तिकिटाचे प्रकाशनही झाले. मात्र, अद्यापही चैत्यभूमीच्या टपाल तिकिटाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची सही झालेली नाही. डॉ. बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आता दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. किमान तोपर्यंत तरी या टपाल तिकिटाचे प्रकाशन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages