शिक्षकांनी घेतली शाळा वाचवण्याची शपथ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 September 2012

शिक्षकांनी घेतली शाळा वाचवण्याची शपथ

शिक्षकांनी घेतली शाळा वाचवण्याची शपथ
Image
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागाच्या अकार्यक्षम प्रशासनामुळे पालिका शाळांचे खाजगीकरण करण्याची चर्चा सुरू आहे. महापालिकेचे शिक्षण म्हणजे मुंबईतील गरीबांच्या मुलाचे शिक्षण; परंतु खाजगीकरण करून गरीब माणसाच्या मुलाच्या शिक्षणाची कवाडे बंद करण्याचा जो डाव पालिका प्रशासनाने आखला आहे. तो सर्वशक्तीनिशी परतावून लावत महापालिका शाळा आणि त्यातील प्राथमिक शिक्षण जगवणारच, असा एकमुखी निर्धार करत हजारो पालिका शिक्षकांनी ५ सप्टेंबर रोजी एका सोहळ्यात शपथ घेतली. शिक्षक सभेचे नेते रमेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षकांनी ही शपथ घेतली.

मुंबई महानगरपालिका शिक्षक सभेद्वारे शिवाजी मंदिर नाटय़गृहात शिक्षक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शिक्षक सभेचे सरचिटणीस रमेश जोशी, दामोदर पाटकर, कार्याध्यक्ष शिल्पा नाईक, कामगार नेते दिवाकर दळवी, समाजसेविका विजूताई जोशी, सुरेश गावडे, प्रकाश शेगुलवाडा आदी मान्यवर उपस्थित होते. या अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या शिक्षक दिन सोहळ्यात उपस्थित हजारो शिक्षकांनी रमेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली पालिका शाळांच्या होऊ घातलेल्या खाजगीकरणाला कडाडून विरोध करत पालिका शाळांच्या इमारती शिक्षक सम्राटांना बहाल करण्याचा डाव उधळून लावण्याचा निर्धार व्यक्त केला, तर महापालिका शाळा आणि त्यातील प्राथमिक शिक्षक जगवून गरीबाच्या मुलाच्या शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवण्याची शपथ घेतली. गरीबाच्या मुलाच्या शिक्षणाचा वाली बनण्याचा निर्धारही सर्वानी व्यक्त केला.

रमेश जोशी यांनी आपल्या घणाघाती भाषणात महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने पालिका शाळा आणि शिक्षणाला घरघर लावली आहे. पालिका शाळांतील शिक्षण दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक नाही, असा दिशाभूल करणारा प्रचार याच लोकांनी सुरू करून पालिका शाळा तथाकथित शिक्षण सम्राटांच्या घशात घालण्याचा डाव योजला आहे.

हा डाव म्हणजे गरीबांच्या मुलांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार आहे. गरीब मुलांचे शिक्षण व त्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावण्याचा प्रकार आहे. शिक्षक सभा हा कुटील डाव उधळून लावेल आणि गरीबांच्या मुलांचे शिक्षण वाचवेल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. गरज पडल्यास या विरोधात शिक्षक सभा उच्च न्यायालयातही दाद मागेल, असे त्यांनी सांगितले.

पालिका शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा लढा अजून संपला नसून गेल्या तीन वर्षापासून प्रशासनाबरोबर अनेक वेळा चर्चा, वाटाघाटी करून देखील प्रशासन शिक्षकांवर सातत्याने अन्याय करत आहे. त्यामुळे ही लढाई उच्च न्यायालयात लढली जाईल, असे रमेश जोशी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS