भटक्या कुत्र्यांमुळे मुंबईकर त्रस्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भटक्या कुत्र्यांमुळे मुंबईकर त्रस्त

Share This

Dogs in pantanagar.jpg
भटक्या कुत्र्यांमुळे मुंबईकर त्रस्त 
मुंबई मध्ये पूर्वी भटक्या कुत्र्यांना पकडून विशिष्ट पद्धतीने नष्ट केले जायचे. परंतु प्राणिमित्र संघटनांनी, नागरिकांनी न्यायालयीन लढा देऊन ही पद्धत बंद केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने अशासकीय संस्थांच्या माध्यमातून १९९८ मध्ये कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने ‘अ‍ॅनिबल बर्थ कंट्रोल (डॉग्ज) रुल्स २००१ ’ हा कायदा देशभर लागू करून भटक्या कुत्र्यांना ठार न मारता त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण खासगी स्वयंसेवी संस्थांकडून करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेने ऑल इंडिया अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन, इन डिफेन्स ऑफ अ‍ॅनिमल, अहिंसा,बॉम्बे सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल आणि पाल्स या संस्थांची निवड करून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण सुरू केले.

माणसाप्रमाणे प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार असतो हा विचार निश्चितच महत्त्वाचा आहे. भटक्या कुत्र्यांना नष्ट करण्याची पद्धत बंद झाल्यानंतर त्यांची संख्या सतत वाढू लागली. दिवसा ही कुत्री फारशी कुठेही दिसत नाहीत, परंतु रात्री बारानंतर गल्ली-गल्लीतून रस्त्यावर फिरताना दिसतात. प्रसंगी सामान्य माणसेही त्यांची शिकार ठरतात. त्यामुळे सरकारने भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरणासाठी मोहीम उघडली खरी; पण तिचे अपयश सामान्य माणूस दररोज पाहत आहे.

मुंबई महानगरपालिकेने २००२ ते २०११ या वर्षांत सुमारे १ लाख ८८ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे. त्यासाठी ६ कोटी ७२ लाख रुपये पालिकेने खर्च केले आहेत. बारा वर्षांत इतकीच कुत्री जन्माला आली का, हा प्रश्न मनात येतो. याचे उत्तर निश्चितच नाही असे म्हणता येईल. कुत्र्याचे निर्बीजीकरण केल्यावर त्याच्या शरीरावर विशिष्ट खूण केली जाते. उदाहरणार्थ कानावर मार्क केला जातो. आपल्याला गल्लीत मार्क केलेली अशी किती भटकी कुत्री दिसतात याचा डोळसपणे शोध घेतला पाहिजे.

आज मुंबई मध्ये सर्वत्र भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मुंबई च्या कोणत्याही रस्त्या वरून, गल्ली मधून कोणताही लहान मुलगा किवा वयोवृद्ध कोणीही सुरक्षित चालू शकत नाही अशी परिस्तिथी आहे. आज प्रत्तेक मुंबईकरांवर कुत्र्यांचा आतंक निर्माण झाला आहे. असाच आतंक शिवसेनेचे शक्तिस्थळ असलेल्या 'मातोश्री' बंगल्याच्या परिसरातील पोलिसांची कडेकोट सुरक्षायंत्रणा भेदून बारा भटक्या कुत्र्यांनी केला होता. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांची झोपमोड केल्याने उद्धव ठाकरे प्रचंड संतापले होते.

विलेपार्ले येथे लहान मुलीला भटक्या कुत्र्यांनी चावे घेतल्याने भटक्या कुत्र्यांचा प्रश्नावर जोरदार चर्चा सुरू असतानाच मातोश्री बंगल्याच्या परिसरातील कुत्र्यांनी पुन्हा उच्छाद मांडल्याने उद्धव ठाकरे प्रचंड संतापले होते. केवळ कलानगर परिसरातील नव्हे तर, मुंबईतल्या भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर तातडीने उपाय योजण्याचे आदेश त्यांनी दिले. उद्धव यांनी पक्षाचे स्थानिक नगरसेवक बाळा सावंत यांना या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास सांगितले. सावंत यांनी वॉर्ड ऑफिसमध्ये फोन करून भटके कुत्रे पकडण्यास सांगितले होते. कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू होताच या भागातील काही श्वानप्रेमींनी भटके कुत्रे पडकण्यास विरोध केला. पण तरीही पालिकेच्या पथकाने १२ कुत्र्यांना पकडले.

खुद्द सेनाप्रमुखांची झोपमोड होत असल्याने व सेनाप्रमुखाना त्रास होत असल्याने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ज्या प्रकारे पालिका प्रशासन आणि नगरसेवकांनी कारवाही केली तशी कारवाही मुंबई मध्ये होत नाही. आपल्या नेत्याला खुश करणारे नगरसेवक ज्या मुंबईकरांच्या मतांवर जिंकून आले आहेत त्या मतदार मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून देत आहेत. २००७ मध्ये ७५ हजार असलेल्या भटक्या कुत्र्यांची संख्या १ लाख ५० हजार पर्यंत झाली आहे. २००१ पासून २०११ पर्यंत ६ लाख ५० हजाराहून अधिक कुत्रे चावण्याचे प्रकार घडले आहेत. २०१० मध्ये १४ जणांचा तर २०११ मध्ये ६ लोकांचा कुत्रे चावल्यामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई मध्ये दरदिवशी सरासरी २२१ लोकांना कुत्रा चावल्याने रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.

प्राणिमित्रांच्या प्रयत्नांनी भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याच्या पद्धतीवर बंदी आली खरी, पण कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम पूर्णपणे यशस्वी व्हावी म्हणून हे प्राणिप्रेमी सरकारी कर्मचा-यांना किती प्रामाणिकपणे मदत करतात हादेखील संशोधनाचाच विषय आहे. प्राणिमित्रांना भटक्या कुत्र्यांबद्दल दया वाटत असली तरी अन्य सामान्य नागरिकांना या प्राणिप्रेमाच्या अतिरेकाचा त्रास होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मुंबई मधील नगरसेवक व पालिका प्रशासनानेही मुंबईकरांना रस्त्यांवरून बिनधास्त फिरता यावे यासाठी भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तकरण्याची आवशकता आहे. 

अजेयकुमार जाधव 
मो - ९९६९१९१३६३
ई मेल- jpnnews100@gmail.com  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages