| मुंबई : खाप पंचायतींद्वारा केला जाणारा हिंसाचार म्हणजे प्रतिक्रांती असून ही प्रतिक्रांती आता उत्तरेकडून दक्षिणेकडे वाटचाल करू लागली आहे. तिला रोखण्याची जबाबदारी सामाजिक सर्वहारा वर्गाने पार पाडली पाहिजे, असे आवाहन थोर विचारवंत आणि प्राच्यविद्या पंडित शरद पाटील यांनी केले. जाती अंताच्या चळवळीचे नेतृत्व सामाजिक सर्वहाराच करू शकतील, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले. येथील सिद्धार्थ कला व वाणिज्य महाविद्यालयात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. 'अनिहिलेशन ऑफ कास्ट' या अजोड ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात दोन प्रकारचे सर्वहारा असल्याचे वक्तव्य केले आहे. युरोप खंडात सामाजिक क्रांती झाली. कारण तेथे एकच प्रकारचा सर्वहारा वर्ग होता. भारतात ही क्रांती केवळ सामाजिक सर्वहाराच करेल, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले. समता, स्वातंर्त्य आणि बंधुता ही त्रिसूत्री विदेशातील भांडवलदारांनी घडवून आणलेल्या क्रांतीतील आहेत, मात्र भारतातील सर्व भांडवलदार हे जाती व्यवस्थेचे गुलाम आहेत. दलित उद्योजकांची संघटना डिक्कीचा संस्थापक मिलिंद कांबळे हे आता भांडवलाच्या माध्यमातून जाती व्यवस्थेचा अंत होईल, असे म्हणतात. ते शक्य नाही. अडीच हजार वर्षापूर्वी जेव्हा भगवान बुद्धाने धम्म तयार केला, तेव्हा भारतात जाती व्यवस्था नव्हती. त्यामुळे आपल्या अखेरच्या दिवसात भगवान बुद्धाने आपला धम्म केवळ 500 वर्षे टिकू शकेल. जाती व्यवस्था संपवून नवी समाज व्यवस्था अस्तित्वात आणायची असेल तर नवा धम्म तयार करा, नवे तत्त्वज्ञान शोधा, असा संदेश आपला शिष्य आनंदला दिला होता. मात्र तसे घडले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. बुद्धाने वयाच्या 46 व्या वर्षी दासांसाठी पंचधर्म आखून दिले. हीच पहिली सामाजिक क्रांती त्यांनी केली होती, मात्र पाश्चात्य असोत की पौर्वात्य शास्त्रज्ञांनी या क्रांतीची दखल घेतली नाही, असे मत त्यांनी नोंदवले. बौद्ध परंपरेतील चौथ्या शतकातील दिग्नाग हा भिक्खू आजवरचा देशातील सर्वात श्रेष्ठ विचारवंत. त्यानेच माणसाचे डोके हे एकजिनसी नाही तर द्वैती आहे. कॉश्नस (जागृत) आणि सबकॉन्शस बुद्धी असे दोन प्रकार मेंदूचे असल्याचे सर्वप्रथम दिग्नागाने सांगितले, मात्र हीच गोष्ट 19 व्या शतकात सिग्मंड फ्रॉयड या मानसशास्त्रज्ञाने सांगितल्यावर आपण ते डोक्यावर घेतले. दिग्नाग, अश्वघोष, नागाजरुन, धमकीर्ती या भिक्खूंनी महायान तत्त्वज्ञानाची मांडणी केली. खरेतर सॉक्रेटिस, प्लेटो, अँरिस्टॉटल या तत्त्वज्ञांचा खूप उदोउदो होतो. मात्र दिग्नाग, अश्वघोष, नागाजरुन, धमकीर्ती यांच्या पासंगालाही ते पुरणार नाहीत, मात्र दलित साहित्यिकांनी महायान तत्त्वज्ञानाला बदनाम करण्याचे प्रकार केले. एवढेच नव्हे तर दलित साहित्यिक हे ब्राह्मणी साहित्याला शरण गेले, अशी टीकाही पाटील यांनी केली. मातृसत्ता नाकारल्याने सोव्हिएत रशियाचे विघटन भारतात पहिले स्त्रीसत्ताक साम्राज्य नित्रतीने सिंधू खोर्यात स्थापन केले. मात्र ब्राह्मणी संस्कृतीने तिला बदनाम केले. जगभरात समता ही मातृसत्तेने स्थापन केली. नवरात्र ही खरी मातृशक्तीचे प्रतीक आहे. जगभरात स्त्रीने शेतीचा शोध लावला. नवरात्रात आणले जाणारे मडके, त्याखाली पसरली जाणारी माती हे सारे त्याचेच प्रतीक आहे. मात्र ही मातृसत्ता नाकारल्यानेच सोव्हिएत युनियनची शकले झाली. समाजवाद कसा उभारायचा, हे मार्क्सने सांगितलेले नाही. लोकशाही दडपून समाजवाद येणार नाही. चीनमध्येही लोकशाहीच्या नावाखाली दडपशाही सुरू आहे, फार काळ हे टिकू शकणार नाही, असेही पाटील म्हणाले. सिद्धार्थचे प्राचार्य कृष्णा पाटील, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अविनाश तळवटकर, नीलोफर भागवत, नजुबाई गावीत यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. |
Post Top Ad
25 October 2012
Home
Unlabelled
सामाजिक सर्वहाराच जाती अंताच्या चळवळीचे नेतृत्व करू शकेल- प्रा. पाटील
सामाजिक सर्वहाराच जाती अंताच्या चळवळीचे नेतृत्व करू शकेल- प्रा. पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment