प्रमुख लेखापाल धस यांना आयुक्तांकडून क्लीन चिट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रमुख लेखापाल धस यांना आयुक्तांकडून क्लीन चिट

Share This

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख लेखापाल (वित्त) राम धस यांना गुरुवारी पालिका सभागृहात आयुक्तांनी 'क्लीन चीट' दिली. मात्र विरोधकांनी यावर नाराजी व्यक्त करीत आयुक्त धस यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. या वेळी सत्ताधारी शिवसेना-भाजपाकडून आयुक्तांच्या निवेदनावर कुठलीही प्रतिक्रिया न उमटल्याने बहुधा धस यांच्याशी 'अर्थपूर्ण' चर्चा झाल्यामुळेच हे प्रकरण दाबले गेल्याची चर्चा पालिका मुख्यालयात रंगली होती.

पालिका सभेत काँग्रेसच्या नगरसेविका वकार उन्निसा यांनी हे प्रकरण उजेडात आणले हाते. राम धस यांनी नगरसेवकांचे आणि सीडब्ल्यूसी कंत्राटदारांचे साटेलोटे असल्याची टिप्पणी केल्याबद्दल हरकतीच्या मुद्दय़ावर धस यांच्या चौकशीची मागणी वकार उन्निसा यांनी केली होती. त्या वेळी विरोधकांबरोबर सत्ताधारी नगरसेवकांनीही धस यांना लक्ष्य करत, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्या वेळी महापौर सुनील प्रभू यांनी जोपर्यंत धस यांची चौकशी होत नाही तोपर्यंत सभागृह सुरू करणार नाही, असे जाहीर केले होते. गुरुवारी सभागृहात पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी या विषयावर निवेदन सादर केले. अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांच्यामार्फत धस यांची चौकशी केल्याचे स्पष्ट केले. धस यांनी कंत्राटदारांच्या पद्धतीवर शेरे दिल्याचे सांगत यामध्ये नगरसेवकांचे साटेलोटे असल्याचे कुठेही ध्वनीत होत नाही, असे स्पष्ट करून त्यांना या टिप्पणीतून क्लीन चिट दिली. तरीही यामुळे नगरसेवकांच्या भावना दुखविल्या गेल्या असतील तर धस यांनी दिलगिरी व्यक्त केली असल्याचे सांगितले. धस यांनी कर्तव्यात गल्लत केली नसून त्यांच्यावरील आरोप सिद्ध होत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करणे योग्य होणार नसल्याचे स्पष्ट केले.

आयुक्तांच्या या निवेदनावर विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांच्या आरोपांना आयुक्तांनी केराची टोपली दाखवत धस यांना पाठीशी घालत क्लीन चिट दिल्याचा आरोप केला. त्यांना बढती देऊन उपायुक्त करून येथून हलवावे, अशी मागणी निकम यांनी केली. मनसे सदस्य प्रकाश दरेकर यांनी दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नसल्याचे सांगत सभागृहाच्या भावनांचा विचार करून अशा प्रवृत्ती थांबविल्या पाहिजेत, अशी मागणी केली. तर नगरसेवक प्रवीण छेडा यांनी धस यांना क्लीन चिट देण्यासाठी आयुक्त येतात हेच योग्य नसल्याचे सांगितले. धस यांनी केलेली टिप्पणी काढणे आवश्यक असल्याची मागणी छेडा यांनी केली. राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी, जर धस यांनी चूक केली तर क्षमा मागण्याची आवश्यकता काय, असा सवाल करीत याबाबत चौकशीची मागणी केली. यावर महापौर सुनील प्रभू यांनी प्रमुख लेखापाल (वित्त) राम धस यांनी यापूर्वी स्थायी समितीतही स्पष्टीकरण केले आहे. आयुक्तांच्या निवेदनामध्ये त्यांनी नगसेवकांची दिलगिरी व्यक्त केली असल्याचे सांगत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रवीण छेडा यांनी नगरसेवकांबाबत केलेली आक्षेपार्ह टिप्पणी काढून टाकण्याची मागणी केल्याने महापौरांनी ही टिप्पणीही काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages