आरपीआयची मुंबईत मराठा आरक्षण परिषद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 October 2012

आरपीआयची मुंबईत मराठा आरक्षण परिषद


रिपब्लिकन पार्टी आठवले गटाने मराठा आघाडीची स्थापना केली असून मंगळवार, 30 ऑक्टोबर रोजी मुंबईत मराठा आरक्षण परिषद आयोजित केली असल्याची माहिती रिपाइं आठवले गटाचे प्रमुख माजी खा. रामदास आठवले यांनी रविवारी जळगावातील पत्रकार परिषदेत दिली.

रिपाइंने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असून, पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार या आरक्षणाबाबत जाणिवपूर्वक अन्याय करत आहे. रिपाइंच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते, असे सांगून या वेळी आठवले पुढे म्हणाले की, मराठा समाजातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी मंगळवार, 30 ऑक्टोबर रोजी रवींद्र नाटय़मंदिर, मुंबई येथे मराठा आरक्षण परिषद आयोजित केली आहे. कोल्हापूर संस्थानचे संभाजीराजे महाराज यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल, तर पुढारीचे संपादक बाळासाहेब जाधव हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवार, छावा संघटनेचे अण्णासाहेब जावळे, भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, शिवसेनेचे नेते रामदास कदम, माथाडी कामगारांचे नेते रवींद्र पाटील, राज्याचे पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम, गृहमंत्री आर.आर. पाटील यांना या परिषदेसाठी निमंत्रित केले असल्याची माहिती माजी खा. रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र व कोकणातून हजारो प्रतिनिधी या परिषदेस उपस्थित राहतील. जळगाव जिल्ह्यात मराठा आघाडीची जबाबदारी सुनील पाटील व अरविंद पाटील यांच्यावर सोपवण्यात आली असून, दोन महिन्यांत आघाडीची जळगाव जिल्ह्यात स्थापना करण्यात येणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS