अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानात थाळीनाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 October 2012

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानात थाळीनाद

मुंबई- सेवासमाप्तीचा लाभ, महागाई भत्ता, बोनस आदी मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी आज (ता. 11) आझाद मैदानात थाळीनाद करून आंदोलन केले. 
एकात्मिक बालविकास सेवा योजनेत सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका काम करीत आहेत. या सर्वांना पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारने 2005 मध्ये घेतला. राज्यात शेकडो वयोवृद्घ अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली गेली; मात्र त्यांना पेन्शनचे फायदे दिले गेले नाहीत. सेविकेला सेवासमाप्तीनंतर एक लाख रुपये व 20 वर्षांपेक्षा जास्त सेवेकरिता प्रतिवर्षी पाच हजार रुपये तसेच प्रत्येक मदतनिसाला सेवासमाप्तीनंतर 75 हजार रुपये व प्रत्येक वर्षाच्या सेवेकरिता 3,750 रुपये असा सेवानिवृत्तीचा लाभ द्यावा, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी अनेक वर्षे करीत आहेत. तसा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असूनही त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जात नाही, त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी दिली. 
सेवासमाप्तीच्या एकरकमी लाभाचा निर्णय सरकारने त्वरित घ्यावा, तसेच कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ व महागाई भत्ता मिळावा, दिवाळीपूर्वी एक महिन्याच्या मानधनाएवढी रक्कम बोनस म्हणून मिळावी, आजारपणाची व उन्हाळी सुट्टी वर्षातून एक महिना भरपगारी मिळावी, कुपोषण दूर करण्यासाठी लाभार्थी खातील असा आहार मिळावा, अशा कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत. या मागण्यांवर राज्य सरकारने कार्यवाही न केल्यास दिवाळीपूर्वी 7 नोव्हेंबरला दादर येथील खोदादाद सर्कलपासून मंत्रालयावर लॉंग मार्च नेण्याचा इशारा कर्मचारी संघाने दिला आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS