कुपोषण रोखण्यासाठी भाजपाची पंचसूत्री - गडकरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 October 2012

कुपोषण रोखण्यासाठी भाजपाची पंचसूत्री - गडकरी


मुंबई : गरिबी, भूक, कुपोषणाविरुद्ध युनोने स्वीकारलेल्या युद्धात सहभागी होत भारतातील बालमृत्यू व गरोदर मातांच्या मृत्यूचे प्रमाण येत्या 2014 पर्यंत आंतरराष्ट्रीय निकषाइतके कमी करण्याचा संकल्प मंगळवारी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी भाजपाशासित प्रदेशातील आरोग्यमंर्त्यांना दिला.

गडचिरोली जिल्ह्यातील डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांच्या शोधग्राममध्ये आयोजित आरोग्यमंत्र्यांच्या परिषदेचा समारोप करताना नितीन गडकरी यांनी सुशासनाला ई-प्रशासनाची जोड देत महात्मा गाधी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या संकल्पनेतील अंत्योदय साधण्याचे आवाहन केले. डॉ. अभय बंग, खा. प्रकाश जावडेकर, डॉ. राणी बंग, विनय सहस्रबुद्धे, अशोक नेते आदी प्रभूती या वेळी मंचावर उपस्थित होते.

तत्पूर्वी सकाळी देशभरातील भाजपाशासित प्रदेशातील आरोग्यमंत्र्यांच्या गडचिरोली जिल्ह्यातील शोधग्राममधील या परिषदेला सकाळी अनौपचारिक सुरुवात झाली. डॉ. अभय बंग यांनी बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी सर्चच्या माध्यमातून गडचिरोलीच्या ग्रामीण भागात अमलात आणलेल्या 'घरोघरी नवजात सेवा' प्रकल्पाचे मॉडल आणि त्याच्या सकारात्मक परिणामांचे पॉवर पॉईंट प्रेझेण्टेशन केले. समारोप करताना भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सामाजिक भान, टीम स्पिरीट, सकारात्मक विचार, आत्मविश्वास, राष्ट्रभावना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सत्तेच्या माध्यमातून जनकल्याणाच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी भाजपाने आपल्या राज्यांमध्ये अमलात आणण्यासाठी निश्चित केलेली पंचसूत्री नितीन गडकरी यांनी या वेळी जाहीर केली. भाजपा व मित्रपक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये माता व बालक रक्षा अभियान आगामी काळात राबवले जाणार आहे. त्यासाठी दोघांकरिताही 'स्वास्थ्य सुरक्षा कार्ड' घराघरात पोहचवून आरोग्य सेवा पुरवणे, मुलींसाठी लोहतत्त्व असलेल्या गोळय़ा उपलब्ध करून देणे, धार्मिक यात्रास्थळी, स्वास्थ्य मेळाव्याचे आयोजन आणि आशा केंद्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे मानधन बँकेमार्फत अदा करणे या बाबींचा पंचसूत्रीत समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS