मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी संजय दिना पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 October 2012

मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी संजय दिना पाटील

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षपदी खासदार संजय दिना पाटील यांची अखेर नेमणूक करण्यात आली. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही घोषणा केली. त्यामुळे पक्षाचे नेते अजित पवार यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा राष्ट्रवादीत सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाचे वारे वाहत होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर अध्यक्ष नरेंद्र वर्मा यांच्या उचलबांगडीचे संकेत मिळाले होते. संजय पाटील, विजय कांबळे, बाप्पा सावंत, किरण पावसकर, प्रकाश बिनसाळे आदी इच्छुकांच्या मुलाखतीही झाल्या. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा असलेल्या संजय पाटील यांना पसंतीही दिली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी प्रसिद्धीमाध्यमांना तसे संकेतही दिले; पण संजय पाटील यांच्या नावाला अजित पवार यांचा तीव्र विरोध होता. या पदावर किरण पावसकर यांची नेमणूक करण्याचा आग्रह त्यांनी धरला होता. त्यामुळे संजय पाटील यांची नेमणूक जाहीर झाली नाही. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद सोडण्यास भाग पाडल्यानंतर आता त्यांच्या पसंतीला बाजूला ठेवून संजय पाटील यांची नेमणूक केली गेल्यामुळे अजितदादांचे पंख छाटण्याचे काम अजूनही सुरू असल्याचे बोलले जाते.

सिंचन विभागातील गैरव्यवहाराबाबत विरोधी पक्षांकडून वारंवार होत असलेल्या आरोपांवर बोलताना नवाब मलिक यांनी सिंचन क्षेत्रातील सर्वच्या सर्व म्हणजे पाचही महामंडळांच्या स्थापनेपासूनच्या कारभारावर श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा राज्य सरकारच्या ताब्यात देण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.

येत्या 20 आणि 21 ऑक्टोबरला पुण्याच्या बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल तसेच इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत. 22 ऑक्टोबरला औरंगाबादमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा राज्यस्तरीय मेळावा होणार आहे, असेही मलिक यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS