सरकार आम आदमीच्या विरोधात - व्यंकया नायडू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 October 2012

सरकार आम आदमीच्या विरोधात - व्यंकया नायडू

मुंबई : भाजपाची सत्ता ज्या-ज्या राज्यांमध्ये आहे त्या राज्यांमधील जनता सुखी समाधानी आहे. मात्र ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे त्या राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, महिलांवरील अत्याचार आदी घटना वाढतच आहेत. त्यामुळे या सरकारला सत्तेवरून खाली खेचून हद्दपार करा, असे आवाहन भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी व्यंकय्या नायडू यांनी आझाद मैदानात शुक्रवारी केले.

एलपीजी सिलिंडरमध्ये कपात व दरवाढीचा निषेध करण्यासाठी भाजपा मुंबई महिला विभागाने आझाद मैदानात मोर्चा काढला होता. त्या वेळी वंकय्या नायडू बोलत होते. काँग्रेसचा हात आम आदमीच्या बरोबर नसून विश्वासघात करणारा हा हात आहे. भाजपाच्या काळात गॅस सिलिंडर तुटवडा नव्हता, पेट्रोलच्या किमती कमी होत्या, काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला मी विचारले 'भाई महंगाई कितनी उपर गयी है' तेव्हा तो म्हणाला, आज महंगाई उपर गई है कल हम-आप जाएँगे, अशा प्रकारे आम आदमीची मस्करी करणारे काँग्रेस सत्तेवरून त्वरित हटवले पाहिजे, असे नायडू म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोनिया गांधी यांना स्वयंपाक घराचे व गॅस सिलिंडर किती लागतात याची माहिती नाही. पंतप्रधानांच्या पत्नी सिलिंडरच्या किमती कमी करा म्हणून सांगत आहेत. तरीसुद्धा याबाबत सरकार काहीच ठोस भूमिका घेत नाही, असे सांगत नायडू यांनी चारोळ्या करत काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. केंद्र सरकारचे रोज नवे घोटाळे समोर येत असताना काँग्रेसशासित राज्ये मागे राहण्यास मागत नाहीत, ती राज्येही रोज घोटाळे करत आहेत. त्यामुळे आता हे सरकार सत्तेवरून खाली खेचलेच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

या वेळी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी या सरकारला अरबी समुद्रात बुडवण्यासाठी आता कामाला लागा. नवरात्रोत्सवात महिलांनी मोठय़ा प्रमाणात जनजागृती करत सरकारला सत्तेवरून दूर करण्यासाठी सामान्य नागरिकांना जागे करा, असे सांगितले. मुंबई अध्यक्ष राज पुरोहित यांनी जमलेल्या महिलांना थाळी नाद करण्यासाठी सरकारला भ्रष्टाचाराचा पाढा वाचा, असे आवाहन त्यांनी आंदोलनकर्त्या महिलांना केले. या वेळी भाजपाचे मुंबईतील आमदार, नगरसेवक, महिला पदाधिकारी आदींसह शेकडो कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
     

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS