मुंबई मध्ये डेंगू पालिकेची धावपळ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 October 2012

मुंबई मध्ये डेंगू पालिकेची धावपळ


मुंबई : प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक यश चोप्रा यांचा मृत्यू डेंग्यूमळे झाल्याची चर्चा असल्याने पालिका प्रशासनाने यश चोप्रा यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे तपासण्यासाठी पालिका आरोग्य खात्यांतर्गत असणार्‍या डेथ कमिटीची मदत घेण्याचे ठरवले आहे. त्यानंतरच त्यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, हे स्पष्ट होईल, असे अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी सांगितले. 

मुंबईत सर्वसामान्यांचे मृत्यू विविध आजारांनी होत असतात, मात्र यश चोप्रा यांच्यासारख्या सेलिब्रिटीचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याची बातमी पसरल्याने खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने सारवासारव करण्यासाठी चोप्रा यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे तपासण्याकरिता प्रथमच 'डेथ कमिटी'ची मदत घेण्याचे ठरवले आहे. 

सध्या मुंबई पालिका रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे 647 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत तीन रुग्णांचा डेंग्यूमळे मृत्यू झाला. मलेरियावर नियंत्रण आणण्यात यशस्वी झाल्यानंतर प्रशासनापुढे डेंग्यूने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यामुळे डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी  पालिका प्रशासनाने कंबर कसली असून 'पंचसूत्री कार्यक्रम' जाहीर केला आहे. डेंग्यूला आळा घालण्यासाठी पालिकेचे विभाग कार्यालयांतील आरोग्य अधिकारी प्रत्येक कार्यालये तपासणार आहेत. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती फ्लॉवरपॉट, फिश टॅण्क, वातानुकूलित यंत्र, फेंग शुईचे बांबूचे झाड, घरातील कारंजे, किचनमधील पाण्याने भरलेली भांडी याद्वारे होते. त्यामुळे त्या ठिकाणी नेहमी पाणी बदलत राहणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. 

डेंग्यूवर आळा घालण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज असून आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांमुळे ऑक्टोबरच्या अखेरीस डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होत असल्याचे मनीषा म्हैसकर यांनी सांगितले. गेल्या दोन आठवडय़ांत यामध्ये 27 ते 30 टक्के घट झाली असून डेंग्यूचे सर्वात अधिक रुग्ण आढळलेल्या 'ई' व 'जी' वॉर्डमध्ये अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. डेंग्यूच्या निर्मूलनासाठी केल्या जाणार्‍या उपाययोजनांमध्ये लक्ष न देणार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा त्या वेळी म्हैसकर यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS