खड्डय़ांना नेते आणि भ्रष्ट अधिकारी जबाबदार - राज ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 October 2012

खड्डय़ांना नेते आणि भ्रष्ट अधिकारी जबाबदार - राज ठाकरे



मुंबई : मुंबईतील रस्त्यांवर वर्षानुवर्षे खड्डे पडत आहेत. हे काम कसे होते, त्यापेक्षा ते का होत आहे? किती वर्षे चालणार? यावर तोडगा काय? असे सवाल करत पालिकेत महत्त्वाच्या पदावर बसलेले नेते आणि प्रशासनातील भ्रष्ट अधिकार्‍यांमुळेच हा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पालिकेत पत्रकारांशी संवाद साधताना केला.

पालिकेत जनतेचा पैसा विकासावर किती खर्च होतो व खिशात किती जातो, हा गहन प्रश्न आहे. ठेकेदार रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची करतात, या रस्त्यांवर खड्डे पडल्यावर पुन्हा याच ठेकेदारांना खड्डे बुजवण्याची कंत्राटे दिली जातात. अशा प्रकारे सुनियोजितपणे जनतेचा पैसा लुबाडणे सुरू आहे. निकृष्ट काम केल्याप्रकरणी दोषी असलेल्यांना दंड आणि पालिका कंत्राटदारांना पुन्हा पालिकेच्या कुठल्याही टेंडर प्रक्रियेत सामील करून घेऊ नये, अशी सूचनाही राज ठाकरे यांनी केली.

मुंबई-पुणे हायवे बांधून 10 वर्षे झाली, मात्र या महामार्गावर आजपर्यंत खड्डे पडले नाहीत, मग मुंबईतल्या रस्त्यांवर वारंवार खड्डे का पडतात? तेथे काय पाऊस पडत नाही का? असा टोला त्यांनी सत्ताधार्‍यांचे नाव न घेता लगावला. युतीच्या काळात बनवलेल्या या महामार्गासाठी गॅमन इंडिया, एल अँण्ड टी, जोग यांसारख्या मोठय़ा कंपन्यांनी काम केले असल्याने हा महामार्ग चांगल्या प्रतीचा बनला, मात्र या मोठय़ा कंपन्या पालिकेतील घाणेरडय़ा राजकारणामुळे पालिकेतील कामे घेण्यासाठी पुढे येत नाहीत. असे राज ठाकरे म्हणाले.

पालिका प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या हातात असल्याने आपण मुख्यमंर्त्यांना भेटणार असल्याचे सांगत रस्त्यांचे टेंडर काढतानाच काळजी घेतली तर चांगल्या कंपन्यांकडून कामे होतील व रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. पालिकेच्या टेंडर पद्धतीवर चर्चा करतानाच मुख्यमंर्त्यांशी टोल नाक्याबाबतही चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS