नवी दिल्ली : भ्रष्टाचारविरोधात रान उठवून देशभरात जनआंदोलन उभारणार्या टीम केजरीवालविरुद्धच आता भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले आहेत. 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' या केजरीवालांच्या संघटनेतील सदस्य प्रशांत भूषण, अंजली दमानिया आणि मयांक गांधी यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने त्यांचीच आता त्रिसदस्यीय निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी केली जाणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले आहे.
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर 100 एकर शेतजमीन लाटल्याचा आरोप डॉ. अंजली दमानिया यांनी केला आहे. मात्र ज्या शेतकर्यांच्या जमीन लाटल्याचा आरोप दमानिया यांनी केला त्या शेतकर्यांनी गडकरींना क्लीन चिट देत दमानिया यांच्यावरच गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. कर्जत येथील कोंडिवडे गावातील 60 एकर जमीन खरेदी करण्यासाठी अंजली दमानिया यांनी शेतकरी असल्याचा दाखला दिला होता. त्यानंतर जमिनीचा वापर बदलून भूखंड पाडले आणि त्या जमिनीवर घरे बांधून विकायला सुरुवात केली होती. ही जमीन एसव्हीव्ही डेव्हलपर्स या कंपनीला दमानिया यांनी दिली. दमानिया स्वत: या कंपनीच्या संचालिका आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर प्रसारमाध्यमांनी केजरीवाल यांना घेरले.
तेव्हा राजधानीत केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या संघटनेच्या सदस्यांवर जाणीवपूर्वक आरोप केले जात असल्याचे म्हटले. ते या वेळी म्हणाले की, अंजली दमानिया, प्रशांत भूषण आणि मयांक गांधी यांच्यावर झालेल्या आरोपांची तीन निवृत्त आणि नि:पक्ष न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्या. ए. पी. शहा, न्या. जसपाल सिंग आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या. बी. एच. मार्लापल्ले यांचा समावेश असणार आहे. आमच्यावरील आरोपांची स्वतंत्र चौकशी करा आणि कुणी दोषी आढळल्यास दुप्पट शिक्षा द्या, असे आम्ही सरकारला वारंवार सांगितले आहे. पण सरकार आमच्यावर चिखल उडवत आहे. त्यामुळे आम्ही एक स्वतंत्र लोकपाल नेमून या आरोपांची चौकशी करायचे ठरविले आहे. तीन निवृत्त न्यायाधीश हे आमचे लोकपाल असणार आहेत. तीन महिन्यांत त्यांना अहवाल आल्यानंतर कुणी दोषी असल्यास त्याला संघटनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मवाळ भूमिका घेतल्याचा माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंग यांचा आरोप केजरीवाल यांनी फेटाळून लावला. एखाद्या राजकीय नेता भ्रष्ट असल्याची खात्री झाल्यावर आम्ही त्याचा पर्दाफाश करत नाही, असेही ते म्हणाले. आपण जाहीर केलेल्या 15 भ्रष्ट मंत्र्यांच्या यादीत शरद पवारांचे नाव समाविष्ट असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. तसेच आपण कुठलाही व्यवहार लपवलेला नाही. जनतेला संभ्रमात टाकण्यासाठी आमच्यावर आरोप केले जात आहेत, ते सिद्ध झाल्यास आम्ही पक्ष सोडू, असा ठाम पवित्रा मयांक गांधी आणि अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत घेतला. देशातील बडय़ा राजकीय नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढल्यानेच आपल्यावर आरोप होत असल्याचे त्यांनी या वेळी म्हटले.
Post Top Ad
20 October 2012
Home
Unlabelled
निवृत्त न्यायाधीशांमार्फत प्रशांत भूषण, अंजली दमानिया, मयांक गांधींची चौकशी
निवृत्त न्यायाधीशांमार्फत प्रशांत भूषण, अंजली दमानिया, मयांक गांधींची चौकशी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment