पालिकेचा विद्यार्थांच्या जीवाशी खेळ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 October 2012

पालिकेचा विद्यार्थांच्या जीवाशी खेळ


मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची होणारी घट चिंतेचा विषय बनल्याने पालिका प्रशासन व सत्ताधार्यांनी विद्यार्थ्यांना २००७ पासून २७ शालेय वस्तूंसह सुगंधी दूध पुरवण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार पहिली ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना १३ रुपये ८६ पैसे खर्चून १२५ मिली व चौथी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना १५ रुपये ५0 पैसे २०० मिली दूध टेट्रापॅक मधून पुरवण्यात येत होतेसन २०१२-१३ या दोन वर्षांसाठी 'महानंद' या सरकारी उपक्रमाला १२१ कोटीचे सुगंधी दुधाचे कंत्राट मंजूर केले. महानंदने दिल्लीतील गोपाळजी या दूध वितरक कंपनीसोबत करार केला असून ही कंपनी गेल्या चार वर्षांपासून दूधवितरण करत आहे. टेट्रापॅकमधील दूध सहा महिन्यांपर्यंत ताजे राहण्याची व्यवस्था आहे. 
गेल्या तीन वर्षांत आतापर्यंत सहा वेळा दूधबाधेचे प्रकार घडले आहेत. पालिकेनं २००९ मध्ये सुगंधी दूध सुरू केल्यानंतर महापालिकेच्या ताडदेव शाळेत २०१० मध्ये विक्रोळी, मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये, २०११ मध्ये घाटकोपर शाळेत तर २०१२ मध्ये सप्टेंबर महिन्यात शिवडीच्या प्रबोधन ठाकरे शाळेत व आता ११ ऑक्टोबरला मालाडच्या शाळेत सुगंधी दूध सुरू केल्यानंतर विषबाधेची ही दुसरी घटना घडलीयं. सत्ततच्या सुगंधी दूधाच्या विषबाधेमुळे पालिकेचं शिक्षण विभाग वादाच्या भोव-यात सापडलयं. 
विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतर एक तासाने दूध व मधल्या सुट्टीत खिचडीचे वाटप करावे असे परिपत्रक पालिकेने शाळांसाठी काढले आहे. काही शाळा या नियमांचे पालन करतात तर काही शाळा करत नसल्याचे उघडकीस आले आहे. मालाडच्या शाळेत खिचडी वाटपानंतर दूध वितरण करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुधाचा त्रास झाला असावा, विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याच्या अन्य काही सवयींमुळे त्रास होत आहे का, याचा शोध प्रशासन घेत आहे. असे शिक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठल खरटमोल यांनी सांगितले. त्यामुळे शाळेतील खिचडीचे नमुनेही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 
२०१० मध्ये पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना सुगंधी दुधाची बाधा झाल्यावर दुधाचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर दूध पिण्यायोग्य नसल्याचे आढळून आले होते. मात्र याच दुधाच्या साठ्यातील खासगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेले बंद टेट्रापॅकच्या पाकिटातील दूध पिण्यायोग्य असल्याचे आढळून आले. पहिल्यांदा पाठवण्यात आलेल्या दुधाचा नमुना दोन-तीन तास खुल्या वातावरणात होता, त्यामुळे दूध खराब झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यापूर्वी मुंबई महापालिकेच्या प्रयोगशाळेने मात्र आपल्या अहवालात हे दूध पिण्यास अपायकारक असल्याचा निष्कर्ष काढला होता.
मालवणी येथील शाळेमधील प्रकरणानंतर पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष विठ्ठल खरटमोल यांनी विद्यार्थांनी नॉनवेज खाल्याने हा प्रकार झाला असावा. शिवडी आणि मालवणी या शाळांमध्येच असे प्रकार पुन्हा पुन्हा का होतात याचा विचार करायला हवा असे सांगून मुस्लीम मुलांच्या शाळेत असे प्रकार होत आहेत असे दाखवण्याचा प्रकार केला जात आहे. परंतु मालवणी येथील शाळेमधील विचार केल्यास ११ बाधित मुलांपैकी फक्त ४ मुलांनीच नॉनवेज खाल्ले होते मग इतर ७ मुलांनी नॉनवेज खाल्ले नसतानाही त्यांना हा त्रास का झाला याचे उत्तर मात्र शिक्षण समिती अध्यक्ष खरटमोल यांनी दिलेले नाही.
पालिकेच्या विद्यार्थांना सुगंधी दुध देवून पालिकेने विद्यार्थांशी खेळ चालवला असल्याचे म्हणावे लागेल.पालिकेने ज्या गोपालजी कंपनीला दुध वितरणाचे कंत्राट दिले होते त्या कंपनीच्या दूधामुळे या आधी विद्यार्थ्यांना बाधा झाली होती त्याच कंपनीशी महानंदा या शासकीय कंपनीने करार करून त्यांचेच दूध पुन्हा महानंद कंपनीचे लेबल लावून वाटले आहे. पालिकेच्या प्रयोगशाळेने हे दूध पिण्या योग्य नसल्याचे म्हटले होते. टेट्रा प्याक मधील दुध ६० ते ७० दिवस चांगले राहते असे म्हटले जात असले तरी शाळांमध्ये दूध वितरीत केले जाते तेव्हा थंड असते परंतु त्याचे वाटप केले जाते तेव्हा त्याचा थंडपणा निघून गेला असतो अश्या परीस्तीतीत लहान मुलांची पचन क्रिया अशा दुधाचे सेवन करून पचवू शकतेच याची शाश्वती नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सुगंधी दुधाचे वाटप करण्यापूर्वी शासनाच्या दुध पुरवठा विभागाच्या वितरणाचा अभ्यास केला असता तर आज अशी परिस्थिती आलीच नसती. सुगंधी दुधाशी साधर्म असलेल्या अमूल दुधाच्या बाटल्या फक्त फ्रीज असलेल्या  दुकानामधून मिळतात तात्पर्य इतकेच आहे कि लोकांना दुधाची पौष्टिकता मिळावी. परंतु पालिकेने आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दुध वाटप करताना शाळामधून सुगंधी दुध थंड राहावे म्हणून कोणतीही सोय केलेली नाही. दुध शाळामधून वितरीत होते तेव्हा पासून वाटपापर्यंत दुधामधील थंड पणा नाहीसा होत असल्याने असे प्रकार होत असतात असे जाणकारांचे म्हणणे आहे. तरी पालिकेच्या सत्ताधारी आणि प्रशासनाने कोणतीही योजना आणताना तशाच प्रकारची कोणती योजना इतर सुरु असल्यास त्याचा योग्य आभ्यास करून योजना सुरु केल्यास विद्यार्थांच्या जीवाशी खेळही होणार नाही तसेच पालिकेचे हसे होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे.
अजेयकुमार जाधव 
मो.९९६९१९१३६३

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS