केजरीवाल पवारांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध एकही शब्द बोलत नसल्याचा आरोप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 October 2012

केजरीवाल पवारांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध एकही शब्द बोलत नसल्याचा आरोप


लवासात पवार कुटुंबियांकडून आर्थिक गैरव्यवहार - वाय पी सिंग यांचा आरोप 
राज्यात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यात केंद्रीय कृषीमत्री शरद पवार यांचाही सहभाग असून इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल मात्र पवारांच्या या भ्रष्टाचाराविरुद्ध एकही शब्द बोलत नसल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंग यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेत केला आहे. 

सिंचन घोटाळ्याबाबत मी स्वतः कागदपत्रे गोळा केली होती,महाराष्ट्रात झालेल्या सिंचन घोटाळ्याबद्दल इंडिया अगेन्स्ट करप्शनला संपूर्ण माहिती आहे. परंतु केजरीवाल ती माहिती जाहीर करत नाहीए. निवडक नेत्यांचेच ते भांडोफाड करत सुटलेत. असा आरोप सिंग यांनी केला. 

भ्रष्ट केंद्रीय मंत्र्याविरोधात आपण स्वतः गोळा केलेली माहिती केजरीवाल स्वतःच्या राजकीय लाभासाठी वापरत असल्याचा आरोप सिंग यांनी केला. लवासाप्रकरणी शरद पवारांवर जोरदार टीका करत सिंग म्हणाले की हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे. लवासा प्रकल्पासाठी अजित पवार यांनी कवडीमोल दराने जमीन उपलब्ध करून दिली, असा आरोप त्यांनी केला. 

अजित पवार यांनी केवळ २३ हजार रुपये प्रती महिना या दराने लेक सिटी कॉर्पोरेशनला ३० वर्षांच्या भाडेपट्टीकरारावर ३४१ एकर जमीन उपलब्ध करून दिली. मुंबई शहरात लहान आकाराचा फ्लॅटसुद्धा या दरात येत नाही. लेक सिटी कॉर्पोरेशनचे २०.८१ टक्के शेयर खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांच्या नावावर होते ', जमीनविक्रीतून सुप्रिया सुळे यांना प्रचंड आर्थिक लाभ झाला असल्याचा आरोपही सिंग यांनी केला आहे. 


वाय. पी. सिंग यांचे आरोप प्रसिद्धीसाठी



मुंबई- लवासात प्रकल्पात कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झालेले नाही. राज्य सरकारच्या नियमाप्रमाणेच लवासाची उभारणी करण्यात येत असून, वाय पी सिंग यांचे आरोप केवळ सवंग प्रसिद्धीसाठी आहेत, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सिंग यांच्या आरोपांना उत्तर दिले. दरम्यान, यानंतर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी नवी दिल्लीत ताबडतोब पत्रकारांशी संवाद साधत हे प्रकरण जुनं असून, सिंग यांच्या आरोपात नवीन असे काहीच नाही, असे सांगितले.

तुम्ही वकील असल्याचे सांगता मग न्यायालयात लवासाच्या विरोधात सर्वोत्तम युक्तीवाद करायचा सोडून मीडिया सेन्सेशन कशाला निर्माण करता, असे सांगत अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल यांच्या रांगेत जावून बसू नका, असा सल्लाही मलिक यांनी सिंग यांना दिला.

लवासाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात असून, त्यासंबंधी आपण अधिक बोलू इच्छित नाही. पण राज्य सरकारच्या हिल स्टेशनच्या धोरणानुसारच राज्य सरकारने लवासाला जमीन दिली असल्याचे पवार यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS