सिंचन घोटाळ्याचा मंत्रालय आगीशी संबंध ? - उद्धव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 October 2012

सिंचन घोटाळ्याचा मंत्रालय आगीशी संबंध ? - उद्धव ठाकरे

रिपब्लिकन पक्षाच्या ५५ वा वर्धापनदिन संपन्न 
मुंबई / अजेयकुमार जाधव 
DSC_0457.JPG
फोटो -उदय कासारे 
सिंचन प्रकल्पांतील घोटाळे उघड होऊ लागल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन ‘होऊन जाऊ द्या चौकशी’ असे सांगत अजित पवार महाराष्ट्रभर फिरत आहेत, त्यांच्यात हे धाडस कुठून आले, मंत्रालयातील आगीशी तर त्याचा संबंध नाही ना, असा खळबळजनक सवाल शिवसेनेचे र्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यात केला, तर सिंचन घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. 

रिपब्लिकन पक्षाच्या ५५ व्या वर्धापनदिना निमित्त एलफिस्टन येथील कामागार क्रीडा मैदानावर मेळावा आयोजित करण्यात आला होता.  या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारवर कडाडून हल्ला चढविला. खास करुन त्यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांना टीकेचे लक्ष्य केले. पाटबंधारे प्रकल्पांतील हजारो कोटी रुपयांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होत असताना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा आपण फेकला आता होऊन जाऊ द्या चौकशी, काढा श्वेतपत्रिका, असे आव्हान देत ते राज्यभर फिरत आहेत. परंतु त्यांच्यात हे एवढे धाडस, एवढी हिंमत कुठून आली, त्याचा मंत्रालयातील आगीशी तर संबंध नाही ना, असा सवाल त्यांनी केला.  राज्यातील आघाडी सरकारने सिंचन घोटाळय़ाचे डाग कितीही पुसले तरी ते मिटणार नाहीत. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीच सत्तेवर येईल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मंत्रालयाच्या आगीच्या चौकशीतून काही बाहेर आलेले नाही, त्याचे कारण अजून कळळे नाही, मंत्रालयाच्या आगीत घोटाळ्यांची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत, त्यामुळे कशाची चौकशी करायची ती करा, असे आव्हान देण्याची त्यांची हिमत होत आहे, असा आरोप त्यांनी केला.  आता अजितदादा आणि सुप्रिया सुळे महाराष्ट्रभर फिरत आहेत, दादांनी महाराष्ट्र संभाळावा व ताईनी केंद्रात जावे, अशी वाटणी सुरु आहे. केंद्र व राज्य त्यांना काही आंदण दिले आहे का, असा सवाल करीत, २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार उलथवून टाकल्याशिवाय महायुती स्वस्त बसणार नाही, विधानसभेवर भगवा व निळा झेंडा फडकावणारच, अशी घोषणा त्यांनी केली.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने महाराष्ट्राचा सत्यानाश केला, इतके घोटाळे झाले, राज्यातील जनतेला प्यायला पाणी मिळत नाही, अशा भ्रष्ट आघाडीला सत्तेवर खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आठवले यांनी दिला. शिवसेना-भाजपबरोबर युती केल्याबद्दल माझ्यावर टीका होत आहे, परंतु माझा निर्णय चुकीचा नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मी प्रतारणा केलेली नाही, असा निर्वाळा आठवले यांनी दिला. गोपीनाथ मुंडे यांनी पाटबंधारे प्रकल्पांतील घोटाळ्यांबाबत श्वेतपत्रिका काढून काही होणार नाही, त्याची सीबीआयमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.


No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS