भुजबळ कुटुंबीयांची संपत्ती तीन वर्षात 21 कोटींवरून 2100 कोटी - किरीट सोमय्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भुजबळ कुटुंबीयांची संपत्ती तीन वर्षात 21 कोटींवरून 2100 कोटी - किरीट सोमय्या

Share This


मुंबई : सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती गेल्या तीन वर्षात 21 कोटींवरून 2100 कोटी झाली असल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी करण्याची मागणी आपण केली आहे. त्याची खुली चौकशी करण्याची परवानगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण का देत नाहीत? असा सवाल करताना छगन भुजबळ यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

छगन भुजबळ, त्यांचे सुपुत्र पंकज भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ यांनी 2009 साली निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती 21 कोटी असल्याचे दाखवले होते, असे सांगून किरीट सोमय्या म्हणाले, मात्र आता भुजबळ कुटुंबीयांच्या एकत्रित मालमत्तेची माहिती घेतली असता ती आता 2100 कोटी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे भुजबळ यांनी 31 मार्च 2012 या मुदतीत आयकर विवरण पत्रही सादर केलेले नाही. भुजबळ यांची परदेशातही प्रॉपर्टी असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

राजे-महाराजांनाही लाजवेल, अशी भुजबळांची प्रॉपर्टी आहे.लोणावळ्याला आलिशान बंगला आहे. त्यात हेलिपॅडही आहे.नाशिकमध्ये 360 एकर जमिनीवर त्यांची प्रॉपर्टी आहे. मुंबईतल्या सर्व समुद्रकिनार्‍यांवर भुजबळ यांचे निवासस्थान आहे. इंडोनेशियात कोळसा खाणी, सिंगापूरमध्ये गुंतवणूक कंपनी, नाशिकमध्ये पॉवर प्लँट, नवी मुंबईतल्या त्यांच्या हेक्स वर्ल्ड मेगा हाऊसिंग प्रकल्पाची किंमत तर साडेपाचशे कोटी रुपये असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला.

या प्रकरणी आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.या प्रकरणाची गुप्त चौकशीदेखील झाली आहे. त्यात या तक्रारीमधील आरोपात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचा अहवाल विभागाने दिला आहे. असे असूनही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अद्याप या प्रकरणाची खुली चौकशी करण्यास का परवानगी देत नाहीत? असा सवालही सोमय्या यांनी केला. छगन भुजबळ म्हणतात, आपण काहीही केले नाही. मग चौकशी का होत नाही, असेही सोमय्या म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages