इंदू मिल जमीन हस्तांतरणाची ५ डिसेंबरपूर्वी संसदेत घोषणा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 December 2012

इंदू मिल जमीन हस्तांतरणाची ५ डिसेंबरपूर्वी संसदेत घोषणा

मुंबई / अजेयकुमार जाधव: 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळण्याची दलित समाजाची मागणी आता पूर्णत्वात येणार असल्याचे दिसत आहे. बाबासाहेबांचे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, अशी इच्छा व्यक्त करत केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या इंदू मिलच्या बारा एकर जागेसाठी वर्षभरापासून सुरू असलेला लढा अखेर मार्गी लागणार असल्याचे संकेत शुक्रवारी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आनंद शर्मा यांनी दिले. संसदेत या संदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला असल्याचे सांगून शर्मा यांनी येत्या 4 किंवा 5 डिसेंबरला जागा हस्तांतरणाची घोषणा केली जाणार आहे, असे म्हटले आहे.

इंदू मिलच्या 12 एकर जागेचा ताबा देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आंबेडकरी समाजाकडून होत होती. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यापासून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापर्यंत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. राज्य सरकारने यासंबंधी हात वर करत जागा हस्तांतरणाचा निर्णय सर्वस्वी केंद्राचा असल्याचे सांगून केवळ मध्यस्थीची भूमिका करणार असे स्पष्ट केले होते. त्यामुळे या प्रश्नावर केंद्र सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले होते. याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी इंदू मिलच्या जागेचा ताबा 6 डिसेंबरपूर्वी देण्याची मागणी करत गुरुवारी यासाठी दिल्लीत संसदेवर मोर्चाही काढला होता. या वेळी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यापासून अनेक केंद्रीय मंर्त्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. तसेच पंतप्रधान सिंग यांचा पुतळाही संतप्त रिपब्लिकन कार्यकत्र्यांनी जाळला होता. 

अखेर यावर शुक्रवारी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आनंद शर्मा यांनी आठवले यांना 4 किंवा 5 डिसेंबरला इंदू मिलची जागा आंबेडकरांच्या स्मारकाला देण्याची घोषणा केली जाणार असल्याचे आश्वासन दिले. संसदेत याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याने लवकरच घोषणा करू, असेही त्यांनी आठवले यांच्यासह रिपब्लिकन शिष्टमंडळाला आश्वासन देताना सांगितले. रामदास आठवले यांनी राजधानीत याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना देत आपण सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचेही म्हटले.
 
रिपब्लिकन सेना व जनतेमुळेच यश
दरम्यान, इंदू मिल ची जागा स्मारकाला मिळावी अशी मागणी विजय कांबळे गेली २० वर्षे करत आहेत त्यासाठी चार वेळा त्यांनी उपोषण केले होते परंतु मागील वर्षी 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी इंदू मिलवर शेकडो कार्यकरत्यासह धडक देत २४ दिवस ताबा घेतला होता. वास्तविक तेव्हापासून इंदू मिलच्या जागेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. रिपब्लिकन सेना व आंबेडकरी जनतेने इंदू मिलचा घेतलेला ताबा यामुळे राज्य सरकारला विधिमंडळात स्मारकाला सर्व जागा देत असल्याचा ठराव करावा लागला होता. तसेच केंद्र सरकारच्या वतीने इंदू मिलची जागा आंबेडकर यांच्या स्मारकाला देण्यात आल्याचे तत्वता प्रधानमंत्र्यांना घोषित करावे लागले होते. आंबेडकरी जनतेच्या आंदोलनामुळे इंदू मिलची जागा लवकरच आंबेडकर यांच्या स्मारकाला मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS