बाळासाहेब ठाकरे यांचं निधन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 November 2012

बाळासाहेब ठाकरे यांचं निधन


Balasaheb Thackeray

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आज, शनिवारी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. दुपारी ३.३३ वाजता बाळासाहेबांनी 'मातोश्री' निवासस्थानी अखेरचा श्वास घेतल्याचं डॉक्टर जलील परकार यांनी सांगितलं आणि 'साहेबां'वर जीवापाड प्रेम करणा-या शिवसैनिकांच्या दुःखाला पारावार उरला नाही. गेली साडेचार दशकं आपल्या एका आदेशावर देशाचं राजकारण फिरवणा-या या महानेत्याच्या निधनामुळे अवघं मराठी मन सुन्न झालं आहे. 

बाळासाहेबांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरीच खालावली होती. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. बुधवारी रात्री त्यांची तब्येत अधिकच नाजुक झाल्यापासून तर लाखो शिवसैनिक तहानभूक हरपून, आपल्या 'दैवता'च्या उदंड आयुष्यासाठी देवाचा धावा करत होते. दुसरीकडे, लीलावती रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक 'मातोश्री'तच त्यांच्यावर उपचार करत होते. कधी ऑक्सिजनचा पुरवठा करून, तर कधी व्हेंटिलेटरच्या सहाय्यानं त्यांचे अथक प्रयत्न सुरू होते. सुदैवानं, दोन दिवस बाळासाहेबांकडून उपचारांना प्रतिसादही मिळाला आणि शिवसैनिक सुखावले. पण आज दुपारी चार वाजल्यापासून कलानगरमध्ये हालचालींना वेग आला आणि सा-यांच्याच काळजात चर्रर्र झालं. थोड्याच वेळात, शिवसेनेचे प्रमुख नेते आणि डॉ. जलील परकार बाहेर आले आणि त्यांनी शिवसैनिकांना नकोनकोशी वाटणारी बातमी दिली. दुपारी ३.३३ वाजता बाळासाहेबांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा श्वासोच्छवास थांबला, अशी माहिती त्यांनी दिली. हे शब्द ऐकून कलानगर परिसरात जमलेले शिवसैनिक गलबलले, त्यांना अश्रू अनावर झाले. ही बातमी टीव्हीवर ऐकणा-या शिवसैनिकांचे डोळेही पाणावले आणि त्यांनी मनोमन बाळासाहेबांना 'जय महाराष्ट्र' केला. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्व ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेनेचे प्रमुख नेते मृत्यूसमयी त्यांच्यासोबत होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS