'नो टच ब्रेस्ट' मशीनद्वारे महिलांसाठी कर्करोग तपासणी शिबीर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'नो टच ब्रेस्ट' मशीनद्वारे महिलांसाठी कर्करोग तपासणी शिबीर

Share This
मुंबई : मुंबईत सध्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. पालिकेने केईएम रुग्णालयात यापूर्वीच स्तन कर्करोगासाठी विशेष विभाग सुरू केला आहे, मात्र स्तनाच्या कर्करोगाची शंका आली तरी सध्याच्या प्रचलित पद्धतीमुळे महिला तपासणी करण्यास संकोच करतात. यासाठी 'नो टच ब्रेस्ट' या मशीनद्वारे महिलांना तपासणी उपलब्ध करण्यात आली आहे. मे. पालमन कंट्रोल्स अँण्ड सिस्टिम या संस्थेच्या वतीने सोमवार, 3 व मंगळवार, 4 डिसेंबर 2012 रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत पालिकेतील महिला कर्मचार्‍यांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी आयोजित करण्यात आली असल्याचे आरोग्य समिती अध्यक्ष गीता गवळी यांनी सांगितले.

'नो टच ब्रेस्ट' या मशीनमुळे मॅमोग्रॅमप्रमाणे महिलांना टेस्ट करण्यासाठी कुठल्याही स्पर्शाची गरज नसते. या मशीनमधील तपासणी वेदनारहित असेल. तसेच तपासणीसाठी डॉक्टरांशी थेट संपर्क येत असल्याने जास्तीत जास्त महिलांना कोणताही संकोच न बाळगता ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करणे शक्य होणार असल्याचे गवळी यांनी सांगितले. तपासणीचा अहवाल केवळ 15-20 मिनिटांत रुग्णाला उपलब्ध होणार आहे.

भारतातील वाढत्या ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रमाणामुळे केंद्र सरकारने 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिलांना 'स्क्रिनिंग' करण्याचे निर्देश दिले आहे. भारतात मॅमोग्रॅम टेस्टसाठी महिला पुढे येत नसल्याने स्तनामध्ये गाठ वगैरे जाणवल्यानंतर त्या टेस्ट करून घेतात; परंतु यामुळे स्तनाचा कर्करोग होण्यापूर्वी दक्षता न घेतल्यामुळे अनेक महिला या रोगाला बळी पडतात. 
भारतात संकोचामुळे हे शक्य होत नसल्याने 'नो टच ब्रेस्ट' ही मशीन फारच उपयोगी आहे. या मशिनद्वारे टेस्ट करताना कोणाचाही स्पर्श होत नसल्याने महिलांना ब्रेस्ट टेस्ट करणे सुलभ होणार असल्याचे गवळी यांनी सांगितले. या मशीनद्वारे तपासणी करण्याची जास्तीत जास्त महिलांनी संधी घ्यावी, असे आवाहन गीता गवळी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages