शहरातील मान्यवर शाळांत व भाषिक महाविद्यालयांत कमी गुण असल्यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जातो. त्यामुळे त्यांना पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी राज्यातील अनेक भागांत जावे लागते. हे टाळण्यासाठी जर बाळासाहेबांच्या नावे मोठी शिक्षण संस्था सुरू झाल्यास मराठी माणूस शिवसेनेला धन्यवाद देतील, यात शंका नाही. बाळासाहेबांनी आपले सारे आयुष्य मराठी माणसांच्या रक्षणासाठी अर्पण केले. जर त्यांच्या नावे अशा प्रकारे शाळा व विद्यालय सुरू झाले, तर त्याचा लाभ मराठी माणसाला मोठय़ा प्रमाणात घेता येईल.
शिवसेनेचा जन्म ज्या दादर भागात झाला त्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कोहिनूर मिलच्या जागी शिक्षण संस्थेच्या रूपाने बाळासाहेबांचे स्मारक उभे राहिले तर त्यांचे स्वप्न खर्या अर्थाने पूर्ण होईल, अशी आशा बाळकृष्ण यांनी व्यक्त केली. कोहिनूर मिलच्या जागी सेनानेते मनोहर जोशी मोठा मॉल उभारत आहेत. त्यामुळे तेथे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. जर त्याजागी बाळासाहेबांच्या नावे शाळा व विद्यालय सुरू झाले, तर लाखो मराठी जनता सेनेला धन्यवाद देईल, असे बाळकृष्ण यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.


No comments:
Post a Comment