शरद राव यांच्या संघटनेत फूट? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 November 2012

शरद राव यांच्या संघटनेत फूट?


वेतन करार अध्र्याहून अधिक कामगारांना मान्य
मुंबई : मुंबई मनपातील सुमारे 1 लाख 5 हजार कर्मचार्‍यांना वेतन करार 19 सप्टेंबर रोजी लागू झाला होता,मात्र या कराराला शरद राव यांच्या म्युनिसिपल मजदूर युनियनने विरोध केल्याने हा वाद न्यायालयात गेला होता.; परंतु आता शरद राव यांच्या संघटनेतील 50 टक्क्यांपेक्षा अधिक कामगारांना हा करार मंजूर असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शरद राव यांच्या संघटनेत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शरद राव यांच्या म्युनिसिपल मजदूर युनियनमध्ये 52 हजार कर्मचार्‍यांनी गेल्या वर्षी वेतन करारास विरोध दर्शवला होता,मात्र पालिकेतील इतर संघटनांच्या कामगारांनी थकबाकी मिळताच राव यांच्या संघटनेतील कामगारांत चलबिचल निर्माण झाली आहे. राव यांच्या विरोधाला डावलत पालिका प्रशासनाने 80 हजार कामगारांना थकबाकी देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार यामधील 78 हजार कामगारांना वेतन कराराची थकबाकी मिळाली आहे. उर्वरित 2 हजार कामगारांना मार्च, 2012 पर्यंत थकबाकी मिळणे अपेक्षित होते,मात्र ही थकबाकी न मिळाल्याने कर्मचारी संघटनेचे नेते अँड. प्रकाश देवदास यांनी औद्योगिक न्यायालयात दाद मागितली आहे. या कर्मचार्‍यांना 12 टक्के व्याजाने ही थकबाकी मिळावी, अशी मागणी देवदास यांनी केली आहे.

गेल्या आठवडय़ात औद्योगिक न्यायालयात झालेल्या सुनावणीत प्रशासनाकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या माहितीत शरद राव यांच्या संघटनेच्या 52 हजारांपैकी 26 हजार 952 कर्मचार्‍यांना वेतन करार मान्य असल्याचे दिसून आले आहे. अद्याप 50 टक्के कर्मचारी राव यांच्याबरोबर असल्यामुळे कामगार संघटनांत उभी फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS