शिवाजी पार्कवरील चौथ-याचे करायचे काय पालिकेला पडला प्रश्न - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 December 2012

शिवाजी पार्कवरील चौथ-याचे करायचे काय पालिकेला पडला प्रश्न


सीआरझेड कायद्याचे उल्लंघन : आभा सिंह

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यविधीसाठी शिवाजी पार्कवर उभारण्यात आलेल्या चौथ-यास केवळ एका दिवसासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, तो चौथरा हटवला जात नसल्याने तेथे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे, असे बृहन्मुंबई पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी मुंबई पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांना पत्राद्वारे कळवले आहे.  

१७ नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुखांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी शिवाजी पार्क या सार्वजनिक मैदानावर करण्यास परवानगी देण्याची मागणी शिवसेनेने राज्य सरकारकडे केली होती. शिवसेनेच्या अधिपत्याखाली असलेल्या बृहन्मुंबई महापालिकेने तसा प्रस्ताव बनवला आणि परवानगीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला.   

बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारानंतर दोन आठवड्यांचा कालावधी उलटला तरी शिवाजी पार्कवरील चौथरा कायम आहे. तेथे सध्या शिवसैनिकांचा पहारा असून अनेक शिवसैनिक व बाळासाहेबांवर प्रेम करणारे लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत.   

६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनासाठी देशभरातून १५ ते २० लाख आंबेडकरीजनता चैत्यभूमीवर व शिवाजी पार्कवर येतात. या सर्व भीमसैनिकांची राहण्याची व्यवस्था तसेच आंबेडकरी पक्षांच्या सभांची व्यासपीठे आणि पाचशेपेक्षा अधिक पुस्तकांचे स्टॉल याच  शिवाजी पार्कवर असतात. याच ठिकाणी मध्य भागी हा चौथरा आहे.  ही गर्दी लक्षात घेता बाळासाहेबांचा चौथरा हलवण्यासाठी पालिकेचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कारवाई करायची कशी आणि कोणी, असा प्रश्न निर्माण झाला असून यामुळे पालिका प्रशासनाची पंचाईत झाली आहे.  

बृहन्मुंबई पालिकेवर युतीची सत्ता असून चौथ-याबाबत महापौर आणि शिवसेनेचे पदाधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे पालिका आयुक्त हा प्रश्न कसा सोडवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अतिक्रमण हटवताना पोलिस केवळ संरक्षण पुरवतात, कारवाई करत नाहीत. त्यामुळे कारवाई पालिकेने करावी, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे पालिका प्रशासनाची कोंडी झाली आहे.

सीआरझेड कायद्याचे उल्लंघन : आभा सिंह 
बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारासाठी परवानगी दिल्यानंतर त्या ठिकाणी चौथ-याचे बांधकाम करण्यास राज्य सरकार आणि महापालिकेने परवानगी देऊन सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंह यांनी एका पत्राद्वारे पर्यावरण सचिव वल्सा नायर यांच्याकडे केली आहे. सीआरझेड 2011 च्या कायद्यानुसार शिवाजी पार्क सीआरझेड 3 मध्ये येते. त्यामुळे तेथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास परवानगी नाही. सध्या या ठिकाणी शिवसेनाप्रमुखांचे तात्पुरते स्मारक म्हणजेच चौथरा बांधला आहे. या बांधकामास राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने परवानगी देऊन सीआरझेड कायद्याचा भंग केला आहे. त्याबाबत आम्ही पर्यावरण सचिवांना पत्र पाठवून कायद्याचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करावी, अशी मागणी केल्याचे सिंह म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS