फेसबुक प्रकरण पोलिसांना भोवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 November 2012

फेसबुक प्रकरण पोलिसांना भोवले

ठाण्याचे अधीक्षक, पालघरचे निरीक्षक निलंबित
मुंबई- "पालघर फेसबुक'प्रकरणी ठाण्याचे पोलिस अधीक्षक डॉ. रवींद्र सेनगावकर आणि पालघर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना निलंबित करण्यात आले आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ठाणे जिल्ह्याचे अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक संग्राम निशाणदार यांना दक्षता घेण्याची तंबी देण्यात आली आहे. याच प्रकरणी उच्च न्यायालयाने पालघरचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रामचंद्र बागडे यांची काल (ता. 26) जळगावला बदली केली. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 18 नोव्हेंबरला झालेल्या अघोषित बंदबद्दल पालघरच्या शाहीन धाडा या तरुणीने फेसबुकवर "कमेंट' केली आणि रिनू श्रीनिवासन हिने "लाईक' केले होते. त्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार केली, तसेच एका जमावाने शाहीनच्या काकांच्या रुग्णालयात मोडतोड केली होती. याप्रकरणी पालघर पोलिसांनी शाहीन आणि रिनू यांना अटक केली होती. त्यांना पालघरचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रामचंद्र बागडे यांनी प्रत्येकी 15 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला होता. रुग्णालयाची मोडतोड केल्याप्रकरणी अटक झालेल्या 10 जणांनाही बागडे यांनी प्रत्येकी साडेसात हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त केले होते. या मुलींना अटक झाल्याबद्दल देशभरात निषेधाचा सूर उमटल्यामुळे राज्य सरकार अडचणीत सापडले होते. 

कोकण विभागाचे पोलिस महानिरीक्षक सुखविंदर सिंग यांनी याप्रकरणी चौकशी करून राज्य सरकारला अहवाल सादर केला होता. त्या दोन युवतींवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. त्या मुलींवर चुकीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कारवाई करू नका, अशा सूचना ठाणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आणि पालघरचे पोलिस निरीक्षक यांना देन्यात आल्या होत्या, पण त्याकडे दुर्लक्ष करून शाहीन आणि रिनू यांना पालघर पोलिसांनी अटक केली होती. ही कारवाई म्हणजे शिस्तभंग असल्याचा ठपका सुखविंदर सिंग यांनी ठेवला. त्यामुळे सेनगावकर आणि पिंगळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस अहवालात केली होती. 

त्यानुसार राज्य सरकारने या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज निलंबित केल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. याप्रकरणी निशाणदार यांनाही समज देण्यात आली आहे. दरम्यान, शाहीन आणि रिनू यांना अटक झाल्यानंतर आधी न्यायालयीन कोठडी देणारे आणि नंतर जामिनावर मुक्तता करणारे पालघरचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रामचंद्र बागडे यांची उच्च न्यायालयाने काल जळगावला त्याच पदावर बदली केली.

त्या "कमेंट' आक्षेपार्ह नव्हत्या 
माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाई करताना अगोदर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तपास करावा. आवश्‍यकता असल्यास सरकारी वकिलांचा सल्ला घ्यावा, अशी सूचना गृह खात्याने केली आहे. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून प्रत्येकाला अभिव्यक्‍तिस्वातंत्र्याचा अधिकार आहे, पण दोन समाज अथवा धर्मांत तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे सुखविंदर सिंग यांच्या अहवालात नमूद आहे. तथापि, त्या दोन मुलींनी केलेली टिप्पणी आक्षेपार्ह तसेच समाजात तेढ निर्माण करणारी नव्हती, असा निष्कर्ष अहवालात असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS