डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रीनिर्वाणानन्तर त्यांना अभिवादन करण्यासाठी वर्षभर लाखो अनुयायी जगभरातून मुंबईच्या चैत्यभूमीवर येत असतात. यामुळे चैत्याभूमिला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे. विशेष असे महत्व प्राप्त झालेल्या चैत्यभूमी विकासासाठी व सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री यांची अध्यक्षतेखाली चैत्यभूमी सुशोभीकरण सुकाणू समिती स्थापन केली आहे. या सुकाणू समितीच्या निगराणीखाली चैत्याभूमिचे सुशोभीकरण करण्याची कामे मुंबई महानगर पालिकेकडून केली जात आहेत. मुंबई महानगर पालिकेकडून चैत्यभूमी सुशोभिकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
मुंबई महानगर पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार चैत्यभूमी परिसरात सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून ग्रॅनाईट व लाद्यांचा वापर करून संत ज्ञानेश्वर मार्ग ते चैत्यभूमी प्रवेशद्वारापर्यंत एकशे चाळीस मीटरपर्यंतची फरसबंदी बसविण्यात आली आहे. जमिनीखालील अस्तित्वात असलेले १५ मीटर लांबीचे पावसाळी गटारचे काम, समुद्रामध्ये असलेले ३८ मीटर लांबीचे पावसाळी गटार, समुद्राच्या लाटांपासून संरक्षण व्हावे म्हणून संरक्षण भिंत व त्यालगत मोठे डागत टाकण्यात आले आहेत, रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर ग्रॅनाईटच्या सुंदर लाद्या बसविण्यात आल्या आहेत, रस्त्यावरील दिवबात्तीचे काम, टप्पा १ ब मधील सांची येथील प्रसिद्ध स्तुपाच्या धतीर्वर चैत्यभूमीवर बावीस मीटर लांबीचे तोरण बांधण्यात आले असून, ब्राँझ धातूचा एकोणीस मीटर उंचीचा भव्य अशोक स्तंभाचे काम, पंचवीस लाख रुपये खर्च करून चैत्यभूमी पोलिस चौकीचे कामही पूर्ण करण्यात आले आहे.
कामाच्या पुढील टप्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या स्तुपाच्या वास्तूचा विस्तार, ध्यानधारणा केंद, सुशोभित कारंजी, विद्युत रोषणाई यांचा समावेश आहे. चैत्यभूमीवरच्या सध्याच्या स्तुपात डॉ. बाबासाहेबांच्या अस्थींचे जतन केले आहे. यामुळे वस्तूचा विस्तार करताना बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन अनुयायांना घेता यावे यासाठी तात्पुरत्या वस्तूची उभारणी करणे हि कामे होणार आहेत. परंतु जुन्या सी.आर.झेड. कायद्यामुळे या कामाला परवानगी मिळाली नसल्याने पुढील टप्यांचे काम अद्याप सुरु झाले नसल्याने चैत्यभूमीच्या सुशोभीकरणाचे काम रेंगाळले आहे. यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली २३ नोव्हेंबरला सह्याद्री अतिथी गृहावर सुकाणू समितीची बैठक बोलावण्यात आली होती.
यावेळी मुंबई महानगर पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी चैत्यभूमी सुशोभीकरणाच्या प्रकल्पाचा आढावा घेतला आणि प्रस्तावित प्रकल्पाचे सादरीकरण केले. पहिल्या टप्प्यातील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. दुस-या टप्प्याचे काम करण्याची तयारी ‘भारतीय बौद्ध महासभे’ने दर्शवली आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने २५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी महानगरपालिकेला २१ कोटी रुपये दिले असून त्यापैकी ८.३३ कोटी रुपये खर्च झाल्याही माहिती दिली आहे. या बैठकीमध्ये चैत्यभूमी सुशोभीकरणाच्या दुस-या टप्प्यासाठी परवानगी घेण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. दुस-या टप्प्याच्या कामासाठी सीआरझेडच्या जुन्या नियमानुसार परवानगी नाकारण्यात आली आहे. परंतु जानेवारी २०११ मध्ये सीआरझेडची नवीन नियमावली आली आहे. त्यानुसार या कामासाठी परवानगी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतरच प्रकल्पाची पुढील कामे करणे शक्य होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे..
चैत्यभूमीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असले तरी पुढील टप्यांचे काम लवकरात पूर्ण व्हावे अशी मागणी आंबेडकरी जनतेने व नेत्यांनी केली आहे. खुद्द मुख्यमंत्री चव्हाण यांनीच नवीन सी आर झेड कायद्यानुसार प्रस्ताव पाठवावा असे सांगितल्याने पालिकेने तसा प्रस्ताव लवकरात लवकर करून मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे पाठवण्याची गरज आहे. पालिकेने पहिल्या टप्प्याच्या कामावेळी चैत्यभूमी समोर लावलेल्या रस्त्यावरील लाद्यांमुळे येथे येणाऱ्या अनुयायांना घसरून पडण्याचे अनुभव घ्यावे लागत होते. पालिकेच्या हि बाब निदर्शनास आल्यावर या लाद्यांवरील गुळगुळीत पणा पालिकेला काढून टाकावा लागला आहे. चैत्याभूमिकडे जाताना उभारण्यात आलेला अशोक स्तंभालाही पालिकेने कला रंग फासला होता पालिकेच्या या चुकीकडे रिपब्लिकन सेनेने लक्ष वेधल्या नन्तर पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना अशोक स्तंभाला सोनेरी रंग लावण्याचे आदेश द्यावे लागले आहेत. तरी चैत्यभूमीच्या सुशोभिकरणाच्या कामामध्ये अशा चुकांकडे पालिकेने दुर्लक्ष करता कामा नये.
चैत्यभूमीचे सुशोभीकरण करण्यासाठी वास्तुविशारद शशी प्रभू यांची निवड करण्यात आली होती सध्या त्यांना या कामातून हटवण्यात आले आहे. पुढील टप्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रभू यांच्या जागेवर त्वरीत नवीन वास्तुविशारदाची नेमणूक करायला हवी. तसेच खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सी.आर.झेड.च्या २०११ च्या नवीन कायद्यानुसार नुसार नव्याने परवानगी मिळण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चैत्यभूमी सुशोभीकरणाची कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सी.आर.झेड.च्या २०११ च्या नवीन कायद्यानुसार नुसार नव्याने परवानगी मिळण्यासाठी प्रस्ताव सदर करण्याचे आदेश प्रशासनाला देवून मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घालून चैत्यभूमीच्या सुशोभिकरणाची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याची गरज आहे.
अजेयकुमार जाधव
( मो.९९६९१९१३६३ )


No comments:
Post a Comment