महापरिनिर्वाण दिनाची जबाबदारी समन्वयाने पार पाडावी - जयंत पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 November 2012

महापरिनिर्वाण दिनाची जबाबदारी समन्वयाने पार पाडावी - जयंत पाटील


मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 56व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे येणार्‍या लाखो भाविकांना अत्यावश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना सर्व शासकीय यंत्रणांनी आपली जबाबदारी समन्वयाने व चोखपणे पार पाडावी, असे निर्देश मुंबई शहराचे पालकमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीची बैठक बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाली. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे, मुंबई शहर जिल्हाधिकारी चंद्रशेखर ओक यांच्यासह पोलीस, बेस्ट, रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बेस्ट बसेसमधील टी. व्ही. संचावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार दाखविण्यात यावेत, अशा सूचना देऊन पाटील म्हणाले, लाखोंच्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी चैत्यभूमीवर दर्शनासाठी येत असतात. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्यापासून सुरक्षिततेसंदर्भातील सर्व व्यवस्थांचे नियोजन काटेकोरपणे करण्यात यावे. दरवर्षी शिवाजी पार्क येथे केईएम रुग्णालयातील एक पथक भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले असते; परंतु यावर्षी जे. जे. रुग्णालयाचे एक व पोद्दार रुग्णालयाचे एक अशी अतिरिक्त दोन पथके तेथे नियुक्त करण्यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांना कळविण्यात यावे, असे निर्देश पाटील यांनी या वेळी दिले.

शिवाजी पार्क परिसरात पोलीस दलातर्फे नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून सीसीटीव्हीच्या सहाय्याने या परिसरात सुरक्षिततेच्या काटेकोर उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS