शिवसेनेतील दोन नंबरच्या पदावर राऊत-जोशी यांची नजर - नीतेश राणे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 November 2012

शिवसेनेतील दोन नंबरच्या पदावर राऊत-जोशी यांची नजर - नीतेश राणे

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बनवण्यासंदर्भात सुरू असलेल्या हालचालींमागे शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांचा स्वार्थ दडलेला असून मनोहर जोशी आणि संजय राऊत यांची नजर शिवसेनेतील दोन नंबरच्या पदावर असल्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीतेश राणे यांनी म्हटले आहे. बाळासाहेबांच्या अंत्यविधीच्या स्थळावरून शिवसैनिक हटण्याचे कोणतेही संकेत मिळत नसल्याच्या पाश्र्वभूमीवर नीतेश राणे यांनी हे वक्तव्य केले आहे.

नीतेश राणे यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, उद्धव ठाकरे हे जेव्हा शिवसेनेचे प्रमुखपद स्वीकारतील, तेव्हा दोन नंबरच्या पदावर म्हणजेच कार्यकारी अध्यक्षपदावर मनोहर जोशी आणि राऊत यांची नजर लागलेली आहे, असे वाटते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून उद्भवलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर शिवाजी पार्कमध्ये ज्या ठिकाणी बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या ठिकाणाचे संरक्षण करण्यासाठी शिवसैनिक पहारा देत आहेत. त्या ठिकाणीच बाळासाहेबांचे स्मारक व्हावे, अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्कवरच होईल, असे मनोहर जोशी यांनी म्हटलेआहे, तर बाळासाहेबांचे स्मारक ही एक भावनात्मक बाब आहे, असे राऊत यांनी म्हटले असून त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि न्यायपालिकेला हस्तक्षेप न करण्याची विनंती केली आहे. मागील दहा दिवसांपासून कट्टर शिवसैनिक अंत्यविधीच्या स्थळावर पहारा देत असून तेथे एक चौथराही उभारण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS