शिवसेना 17 डिसेंबरला स्वत:हून चौथरा हलवणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 December 2012

शिवसेना 17 डिसेंबरला स्वत:हून चौथरा हलवणार

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील समाधीस्थळावरून निर्माण झालेला वाद शांततेत मिटण्याची चिन्हे दिसू लागली असून 17 डिसेंबर रोजी चौथरा हलवण्यात येणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पोलीस आयुक्तांना शिवसेनेने यासंदर्भात माहिती दिली आहे. या चौथर्‍याच्या मुद्दय़ावरून मुंबई महापालिकेने महापौर सुनील प्रभू यांच्यासह शिवसेनेला नोटीस बजावली होती. 

शिवसेनाप्रमुखांच्या अंत्ययात्रेला मोठय़ा प्रमाणावर गर्दी होईल ही बाब लक्षात घेऊन, पोलिसांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे सरकारने शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिली होती. मात्र ही परवानगी तात्पुरत्या स्वरूपाची होती, परंतु शिवसेना ही जागा सोडण्यास तयार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर आणि विविध थरांतून होत असलेल्या विरोधानंतर महापालिकेने चौथरा हटवण्याची नोटीस बजावली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही शिवसेना नेत्यांनी विश्वासघात केला, अशी प्रतिक्रिया दिली होती.दरम्यान, शिवाजी पार्कचे नामांतर शिवतीर्थ करण्याबाबतही शिवसेनेतून हालचाली सुरू झाल्या होत्या.

महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने ठराव पास करून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. शिवसेनेच्या या पविर्त्यालाही मोठा विरोध होऊ लागला होता. एकंदर या सर्व पाश्र्वभूमीवर वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. परंतु आता या प्रकरणी शिवसेनेने एक पाऊल मागे घेतले असून शिवसेनाप्रमुखांच्या निधनाला 17 डिसेंबर रोजी एक महिना होणार आहे. त्यामुळे एक महिन्यानंतर, म्हणजेच 17 डिसेंबर रोजीच हा चौथरा हलवण्यात येईल, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS