स्मारकाचा खर्च राज्य सरकारचा - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्मारकाचा खर्च राज्य सरकारचा - मुख्यमंत्री

Share This
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार असून हे स्मारक उभारण्यासाठी एका प्राधिकरणाचीही स्थापना करण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत जाहीर केले. विशेष म्हणजे येथील एक इंचही जागा व्यावसायिक वापरासाठी उपयोगात आणू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचा निर्णय जाहीर केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. 

या निर्णयामुळे देशातील मानवतावादी विचारांना प्रोत्साहन मिळेल, असे ते म्हणाले. डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाला इंदू मिलची जागा देण्यात यावी, अशी विनंती आपण एका सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना 31 डिसेंबर 2011 रोजी केली होती. त्याचवेळी पंतप्रधानांनी याला तत्त्वत: मान्यता दिली होती. यासाठी त्यांनी वस्त्रोद्योग मंर्त्यांसह सात जणांची समिती स्थापन केली होती. राज्याचे सचिव, गृहसचिव तसेच महापालिका आयुक्त या समितीचे सदस्य होते. आपल्या दिल्ली भेटीत आपण पंतप्रधानांकडे वारंवार पाठपुरावा केला. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. सिंग तसेच वस्त्रोद्योगमंत्री आनंद शर्मा यांच्या सहकार्यामुळे ही जमीन मिळवणे शक्य झाले, असेही त्यांनी सांगितले. ही जमीन विनामूल्य मिळाली की याबद्दलच टीडीआर त्यांना देण्यात आला, असे विचारले असता त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. जागा देण्याचा निर्णय झाला आहे. आता पुढची कायदेशीर प्रक्रिया होईल, असे ते म्हणाले. त्यासाठी किती खर्च येईल, हे सांगणेही कठीण आहे. 

राज्याच्या आर्थिक स्थितीचा या वेळी विचार करणे योग्य ठरणार नाही. मंत्रिमंडळ याबाबत योग्य तो निर्णय घेईल, असेही मुख्यमंर्त्यांनी स्पष्ट केले. या स्मारकासाठी आंतरराष्ट्रीय स्तराच्या आर्किटेककडून आराखडे मागवण्यात येतील. पर्यावरण खात्याच्या नियमानुसार या स्मारकात व्यावसायिक काम केले जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या जागी असलेला चौथरा हटवण्यासाठी महापालिकेने नोटीस पाठवली आहे. ही नोटीस म्हणजेच कारवाई सुरू झाली आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा विषय पर्यावरण खात्याकडे पल्रंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages