नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मुंबईतील इंदू मिलची जागा हस्तांतरण करण्यासंदर्भात बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा झाली, मात्र त्या वेळी बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी केवळ साडेबारा एकर जागा न देता आंबेडकरांचे देशासाठी कार्य पाहता किमान 30-40 एकर जागा देण्याची मागणी केली. त्याचबरोबर सरकार स्मारकासाठी किती खर्च करणार, असा मुद्दा उपस्थित केला त्या वेळी काही काळ सभागृहात गदारोळ निर्माण झाला.
केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आनंद शर्मा यांनी लोकसभेत यासंदर्भातील माहिती देताना म्हटले की, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्यासाठी केंद्राकडून इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेचा ताबा महाराष्ट्र राज्य सरकारला दिला जात आहे. गुरुवार, 6 डिसेंबर रोजी आंबेडकरांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या अस्थी मुंबईस्थित राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या इंदू मिलच्या जवळील चैत्यभूमीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. आंबेडकरांचे लाखो अनुयायी या ठिकाणाला दरवर्षी पुण्यतिथीनिमित्त भेट देतात अन् ही जागा त्यांच्यासाठी तीर्थक्षेत्राप्रमाणे आहे. त्यामुळे जनतेच्या भावनांचा आदर राखत महाराष्ट्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत, तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झालेल्या सर्वमतानुसार या ठिकाणी स्मारक उभारण्यासाठी मिलची साडेबारा एकर जागा राज्य सरकारला हस्तांतरित केली जाणार आहे. शर्मा यांनी ही घोषणा करताच सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवत त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले, तर राज्यसभेत आनंद शर्मा यांचे लिखित निवेदन संसदीय कार्यमंत्री राजीव शुक्ला यांनी सादर केले. मात्र तत्पूर्वी बसपा अध्यक्षा मायावती यांनी आंबेडकरांचे देशासाठी योगदान पाहता केवळ साडेबारा एकर जमीन कमी असून त्यासाठी किमान 30-40 एकर जागा देण्याची मागणी केली. यावरून बसपाच्या सदस्यांनी एकच गदारोळ केल्याने सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले होते, मात्र त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताच दुपारी 12 वाजता शर्मा यांनी जमीन हस्तांतरित करण्याची घोषणा केली.
Home
Unlabelled
इंदू मिलचे हस्तांतरण संसदेतही गदारोळ
इंदू मिलचे हस्तांतरण संसदेतही गदारोळ
Share This
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2013. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.


No comments:
Post a Comment